पिंपरी चिंचवड : गेल्या पाच वर्षात महापालिकेतील सत्ताधारी भाजपने शहराचा विकास केला आहे. जनतेचा फायदा झाला अशी पूर्ण केलेली पाच मोठी कामे सांगावीत, त्यांचे आभार मानू, असे जाहीर आवाहन शिवसेनेचे संपर्क नेते आणि माजी मंत्री सचिन आहिर यांनी शहर भेटीत भाजपवर गुरुवारी (ता.9 डिसेंबर) टीका केली होती.
या टीकेला प्रत्युत्तर देताना सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले की, राज्यातील तुमच्या सरकारने गेल्या दोन वर्षात पूर्ण केलेली दहा कामे सांगावीत. आम्ही तुमच्या सरकारचा भर चौकात जाहीर सत्कार करू आणि अभिनंदनही करु, असे प्रतिआवाहन त्यांनी अहिरांना दिले.
ज्यांना आपले दहा नगरसेवक निवडून आणता येत नाही त्यांनी अशी विचारणा करावी हे हास्यास्पद आहे. स्मार्ट सिटीत संचालक असलेल्या आपल्याच पक्षाच्या सदस्याला घेऊन शहराचा फेरफटका त्यांनी मारला असता, तर भाजपावर खोटेनाटे आरोप करण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती, असा टोला ढाके यांनी अहिर आणि शिवसेनेला लगावला.
चिंचवड महापालिकेमध्ये पुन्हा भाजपचीच सत्ता येणार याचा अचुक अंदाज आल्यामुळे शिवसेनेच्या व विरोधकांच्या पायाखालची वाळु सरकली आहे. त्यांच्याकडे आरोप करण्यासाठी कसलाही मुद्दा नाही. म्हणून केवळ स्टंटबाजी करण्यासाठी बिनबुडाचे आरोप ते करीत आहेत, असे ते म्हणाले.
संपर्क नेते झाल्यानंतर अहिर हे काल प्रथमच पिंपरी – चिंचवडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी 2017 मध्ये प्रथमच मोठ्या विश्वासाने सत्ता सोपवलेल्या जनतेचा भाजपने विश्वासघात केला असल्याची सडकून टीका केली. भाजपने फक्त सत्तेचा दुरुपयोगच केल्याचा हल्लाबोल त्यांनी केला होता. त्याचा समाचार ढाके यांनी लगेचच घेतला.
आहिर यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा पुरावा नसताना फक्त येऊ घातलेली महापालिका निवडणूक डोळयासमोर ठेऊन त्यांनी बिनबुडाचे आरोप करण्याची स्टंटबाजी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे, असे ते म्हणाले.
स्मार्ट सिटीच्या माध्यमातुन आम्ही पुढच्या तीस वर्षाचे नियोजन करुन विकासाची कामे मार्गी लावत आहोत. त्यावर जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. आणि याच विश्वासाच्या जोरावर पुन्हा पालिकेत सत्तेतही येणार आहे, असा दावाही त्यांनी केला.