मणिपूर : ईशान्य भारतातील मणिपूर गेल्या ८३ दिवसांपासून धुमसत आहे. राज्यातील हिंसाचाराच्या काही चित्रफिती आता समोर येत आहेत. मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मणिपूर मधील हिंसाचाराच्या दरम्यानच दोन महिलांना विवस्त्र करीत रस्त्यावर फिरवले जात असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. सदर घटना 4 मे रोजी घडल्याचे समोर आले आहे.
नरेंद्र मोदींनी सोडलं मौन
या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपले मौन सोडले आहे. मोदी म्हणाले की, पाप करणारे, गुन्हा करणारे किती आहेत, कोण आहेत हे सर्व समोर येईलच मात्र ही घटना संपूर्ण देशासाठी लज्जास्पद आहे. 140 कोटी भारतीयांना शरमेनं मान खाली घालावी लागत आहे, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.
मी सर्व मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो, आपल्या राज्यात कायदा सुव्यवस्था अधिक मजबूत करावी. खासकरुन आपल्या मातांच्या आणि बहिणींच्या रक्षणासाठी कठोर निर्णय घ्या. असंही पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
सुप्रीम कोर्टाचा सरकारला इशारा
या घटनेवर सुप्रीम कोर्टाने देखील गंभीर दखल घेतली असून केंद्र आणि राज्य सरकारला आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली आहे याची माहिती देण्यास सांगितलं आहे. जर सरकारने काही पाऊल उचललं नाही, तर सुप्रीम कोर्ट (Supreme Court) उचलेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
आम्ही कारवाई कऱण्यासाठी सरकारला फार कमी वेळ देत आहोत. जर काहीच कारवाई झाली नाही तर आम्ही कारवाई करु, अशा शब्दांत खंडपीठाने इशारा दिला आहे. 28 जुलैला सुप्रीम कोर्टात याप्रकरणी सुनावणी होणार आहे.