Sunday, December 8, 2024
Homeराज्यधक्कादायक : सामूहिक बलात्कारातील पीडितेला हद्दपार करण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर

धक्कादायक : सामूहिक बलात्कारातील पीडितेला हद्दपार करण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर

बीड : सामूहिक बलात्कारातील पीडित महिलेला आधार देण्याऐवजी महिला ही गावकऱ्यांना त्रास देत असून तिची वागणूक व्यभिचारी आहे असा आरोप करत ग्रामपंचायतने महिलेच्या चारित्र्यावर संशय घेत तिच्यासह कुटुंबावर हद्दपारीचा ठराव मंजूर करुन घेतला आहे. एवढंच नाही तर पोलीस अधीक्षक कार्यालयात गावकऱ्यांनी ठिय्यादेखील घातला होता. या अमानवीय घटनेनंतर सामाजिक स्तरातून निषेध व्यक्त होतो आहे. 

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात गावकऱ्यांनी मोठा गोंधळ घातला होता. सगळ्यात धक्कादायक दृष्य म्हणजे गावकऱ्यांच्या या जमावातून एक महिला आणि तिच्या चार चिमुकल्या मुली कशाबशा स्वतःचा जीव वाचवत बाहेर पडल्या. पोलीस अधीक्षक कार्यालय समोरच या महिलेला मारण्याचा प्रयत्न देखील झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला पीडित आहे. काही वर्षांपूर्वी गावातील चार नराधमांनी या पीडितेवर सामूहिक बलात्कार केला होता. बलात्कारानंतर न्यायालयाने या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. 

दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर पीडितेचा गावकऱ्यांकडून छळ

जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर गावातून या पीडित महिलेला त्रास सुरु झाला. जीवे मारण्याचाही प्रयत्न झाला. धक्कादायक म्हणजे ग्रामसेवक सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी या महिलेच्या वागणुकीवर संशय घेत गावातून 28 डिसेंबरला हाकलण्याचा आणि तडीपार करण्याचा ठराव देखील मंजूर करुन घेतला आहे.

याच ठरावाची प्रत पोलीस अधीक्षकांना देखील देण्यात आली. पुरोगामी महाराष्ट्राला लज्जाहीन करणारी ही घटना गेवराई तालुक्यातील पाचेगाव इथे घडली आहे. परिसरातील दोन गावांनीदेखील या पीडित महिलेच्या तडीपार याबद्दल ग्रामपंचायतीत ठराव पास करून घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या घटनेचा सामाजिक स्तरातूनदेखील निषेध करण्यात येत आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय