मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष सुरू होता. अखेर गुरूवारी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्यानंतर या सत्तानाट्याला पूर्णविराम लागला. आता शिवसेनेचे बंडखोर आमदार देखील मुंबईत परतले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी नंतर आता नव्या सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ३ आणि ४ जुलै रोजी विधानसभेचं अधिवेशन बोलावलं आहे. यासाठी आता शिवसेनेचे ३९ बंडखोर आमदार आणि अपक्ष १० आमदार आज गोव्याहून मुंबईत दाखल झाले आहेत. गोव्यातील ताज, सुरत (गुजरात), गुवाहाटी (आसाम) अशा तीन राज्यांमधील प्रवासानंतर तब्बल ११ दिवसांनी हे बंडखोर आमदार पणजीहून मुंबईत दाखल झाले आहेत.
बंडखोर आमदार मुंबईतील ताज प्रेसिडेंट या हॉटेलमध्ये मुक्कामी असणार आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत त्यांची महत्वाची बैठक होणार आहे, या बैठकीत शिंदे सरकारमधील खातेवाटप आणि मंत्रिपदासाठी चर्चा होणार आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सीआरपीएफचे दोन हजार जवान मुंबईत तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे कडक सुरक्षाव्यवस्थेत शिंदे गटच्या आमदारांना मुंबईत आणण्यात येणार आहे.