पुणे : शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्यावर पक्षाने मोठी कारवाई केली आहेे. आढळराव पाटील यांनी पक्ष विरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांची पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या होत्या त्यावरून हि कारवाई केली आहे. आढळराव पाटील यांनी, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांची नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले होते. तसेच त्यांनी एकनाथ शिंदे यांचा फोटो शेअर करत गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा असेही त्यांच्या फोटोवर लिहण्यात आले आहे. मात्र या फोटोवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो टाकण्यात आला नाही. यावरून त्याच्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
आढळराव पाटील यांनी २००४ मध्ये राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. २००४, २००९ आणि २०१४ असे सलग तीन वेळा शिरूर लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत त्यांचा राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे यांनी पराभव केला. भिमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे ते चेअरमन राहिलेेल आहेत.