Wednesday, February 5, 2025

शक्ती मिल सामूहिक बलात्कार – फाशीची शिक्षा रद्द

मुंबई : शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील तीन आरोपींची मुंबई हायकोर्टानं फाशी रद्द केली आहे. मुंबई सत्र न्यायालयानं ४ डिसेंबर २०१४ रोजी सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आरोपींनी हायकोर्टात दिलेलं आव्हान कोर्टानं ३ जून २०१९ मध्ये फेटाळून लावलं होतं. त्यानंतर ही शिक्षा निश्चित करण्याच्या याचिकेवरील नियमित सुनावणी न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे पार पडली. या खंडपीठानं सर्व दोषींच्या फाशीच्या शिक्षेवर राखून ठेवलेला आपला निकाल गुरूवारी जाहीर केला. 

राज्य सरकारनं या खटल्यासाठी अॅड. दिपक साळवी यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी निकालाचं वाचन केलं. हायकोर्टाकडून विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अन्सारी या आरोपींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रूपांतर केलं आहे. 

मुंबईतील महालक्ष्मी येथील शक्ती मिल कंपाऊंडमध्ये २२ ऑगस्ट २०१३ ला एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. छायाचित्रकार असणारी महिला आपल्या सहकाऱ्यासोबत फोटाग्राफी करण्यासाठी गेली होती. यावेळी पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला होता.

हे प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापची लाट उसळली होती. पोलिसांनी याप्रकरणी विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अन्सारी, सिराज खान आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली होती. कोर्टाने सिराज खान याला जन्मठेपेची आणि इतर तिघांना फाशीची शिक्षा सुनावली होती. तर अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles