महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीद्वारे घेण्यात येणारी संयुक्त पूर्वपरीक्षा शनिवारी पुणे जिल्ह्यात सुरळीत पार पडली. परंतु नोंदणी केलेल्या उमेदवारांपैकी तब्बल साडेसात हजार परीक्षार्थ्यांनी परीक्षेला दांडी मारल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे जिल्ह्यात एमपीएससी पूर्वपरीक्षेसाठी 40 हजार 01 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 32 हजार 399 परीक्षार्थींनी विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा दिली. तर 7 हजार 602 परीक्षार्थी परीक्षेला गैरहजर असल्याचे दिसून आले.
पुणे जिल्ह्यातील 102 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी 88 केंद्रे पुणे शहरात, 6 खेडमध्ये, 3 पुरंदरमध्ये तर 5 मावळ हद्दीत होती. परीक्षेसंदर्भात उमेदवारांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षा केंद्रांवर अत्यंत चोख बंदोबस्त होता. त्यामुळे कोणताही गैरप्रकार झाला नाही. यापुढे आता वर्णनात्मक परीक्षा द्यावी लागणार असल्यामुळे परीक्षार्थींनी वेळ घेऊन विचारपूर्वक परीक्षा दिली. परीक्षेची उत्तरसूची आल्यानंतरच पेपरचा कटऑफ साधारण काय असेल याविषयी सांगता येणार आहे.