पुणे : कामगारांच्या न्याय हक्कांसाठी अहोरात्र झटणारे ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड सुभाष सरीन यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. चिंचवड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना गुरुवारी ( ता.१६ ) रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पिंपरी चिंचवड शहरातील जेष्ठ कम्युनिस्ट नेते, पिंपरी चिंचवड मनपा कर्मचारी महासंघाचे माजी पदाधिकारी असलेले कॉम्रेड सुभाष सरीन यांचे ७८ व्या वर्षी चिंचवड येथे निधन झाले.
अनेक लढे, आंदोलनांच्या माध्यमातून त्यांची जनसामान्यांत कॉम्रेड हीच ओळख होती. अनेक कामगारांना, कष्टकऱ्यांना न्याय मिळवून दिला. पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या स्थापनेपासून २०१५ पर्यंत त्यांनी कामगार संघटनेची धुरा सांभाळली. महापालिका कर्मचारी महासंघात सक्रिय सहभाग घेत त्यांनी प्रशासनासमोर आपली बाजू मांडली. कामगारांचे प्रश्न मांडले. ते यशस्वीपणे सोडवले. एक अभ्यासू, जाणकार नेता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे क्रांतिकुमार कडुलकर म्हणाले, “१९७० च्या दशकात पिंपरी चिंचवड शहरातील लाल बावट्याच्या नेतृत्वाखाली कामगारांवरील अन्याया विरोधात लाल बावट्याची संघटना उभी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. आमच्या सारख्या तरुणांना मार्क्सवाद आणि भारतीय वर्गीय चळवळ यांचे मार्गदर्शन त्यांनी वेळोवेळी केले होते. खरा कार्यकर्ता गरिबांच्या वस्तीत फिरतो, असे सांगणाऱ्या कॉम्रेड सुभाष सरीन यांंना आम्ही अखेरचा लाल सलाम करतो.”