Saturday, April 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांचे निधन, पत्रकार संघाने वाहिली आदरांजली

ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांचे निधन, पत्रकार संघाने वाहिली आदरांजली

पिंपरी चिंचवड (क्रांतिकुमार कडुलकर) : शहरातील ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले यांचे वयाच्या ६२ व्या वर्षी आज सकाळी वायसीएम हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या निधनाने पत्रकारितेसह सामाजिक स्तरातूनही शोक व्यक्त केला जात आहे.

विजय भोसले यांना पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली. भोसले यांच्या जाण्याने संपूर्ण राज्यातील एक निर्भीड व आदर्शवादी पत्रकार हरपला असल्याची प्रतिक्रिया मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव नाना कांबळे यांनी यावेळी व्यक्त केली.

पत्रकारितेला वाहून घेतलेले आयुष्य ते शेवटच्या श्वासापर्यंत जगले आहेत. अतिशय निर्भीड आदर्शवादी व अभ्यासू पत्रकार म्हणून राज्यभरात त्यांची ओळख होती. स्पष्ट वक्तेपणा व सडेतोडपणा ही त्यांची वैशिष्ट्ये होती. आपल्या करारी भूमिकेमुळे त्यांनी राजकारणात चुकीची भूमिका घेणाऱ्या नेत्यांना त्याचबरोबर शासकीय अधिकाऱ्यांना कधीच माफ केले नाही चुकीचे वागणाऱ्या व्यक्तीचा त्याच्या तोंडावर बुरखा पाडण्याचे काम विजय विनायकराव भोसले यांनी केले.

गेली ४१ वर्षे ते पिंपरी चिंचवड शहरात पत्रकारिता करत होते त्याचबरोबर केसरी वृत्तपत्रासाठी विधिमंडळ वार्तांकनाचे कामही ते पार पाडत होते. मुंबईतही त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविला होता. राज्यातील आमदार असो की मंत्री असो की कोणीही शासकीय अधिकारी अथवा सचिव असो प्रत्येकालाच विजय भोसले यांच्या आदर्शवादी स्पष्ट वक्तेपणाचा अनुभव आला आहे असे असले तरी राज्यात विजयरावांच्याबद्दल आपुलकी आणि आदर खूप मोठ्या प्रमाणावर होता.

भोसरी परिसरात एका शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीब मुलांना घडविण्याचे देखील काम पार पाडले, अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचा जवळचा संबंध होता.

चुकीच्या व्यक्तीला कधीच पाठीशी न घालता या शहरासाठी म्हणून व सर्वसामान्यांसाठी म्हणून त्यांनी आपली पत्रकारिता जोपासली होती. त्यांच्या निर्भीड व आदर्शवादी पत्रकारितेमुळेच त्यांच्या निवृत्तीनंतर सुद्धा केसरी वृत्तपत्राने त्यांच्यावर उपसंपादक म्हणून जबाबदारी कायम ठेवली होती व आपली जबाबदारी ते अतिशय निष्ठेने पार पाडत होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय