मुंबई : राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यभरात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व दुकाने बंद असतानाही राज्यात दररोज 50 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत आहेत. राज्यातील अनेक शहरांमधील रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसिवीर, यांचा तुटवडा भासत असल्याने आरोग्य व्यवस्था मोडकळीस पडली आहे.
राज्यातील करोना संसर्गाला रोखण्यासाठी केवळ संपूर्ण कडकडीत बंद हाच पर्याय असल्याचा सूर मंत्रिमंडळातून येत आहे. त्यामुळे राज्यभरात मागील वर्षी सारखा कडकडीत लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रात्री 8 पासून राज्यात कडकडीत लॉकडाऊनची घोषणा करावी, अशी मागणी मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यानी केली आहे.