Tuesday, January 14, 2025
HomeNewsपुणे जिल्ह्यात मंगळवार पासून शाळा सुरू होणार !

पुणे जिल्ह्यात मंगळवार पासून शाळा सुरू होणार !

महापालिका क्षेत्रातील शाळांमधून फिरत्या पथकाद्वारे लसीकरण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोविड संसर्गाचे प्रमाण कमी झाले असल्याने कोविड विषयक मार्गदर्शक सुचनांचे पालन करून 1 फेब्रुवारीपासून शाळा सुरू करण्यात याव्यात आणि महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये फिरत्या पथकाद्वारे लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. 

विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते.  यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख उपस्थित होते. 

पवार म्हणाले, पहिली ते आठवीचे वर्ग अर्धवेळ सुरू करण्यात यावे, तर नववी ते बारावीचे वर्ग पूर्णवेळ सुरू करावेत. पुढील आठवड्यात कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व शाळा पूर्णवेळ सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबतचा निर्णय पालकांनी घ्यावा, त्याबाबत तूर्तास सक्ती करू नये. 1 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होत असल्याने लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा, लसीकरण झाले नसल्यास विद्यार्थ्यांना लसीकरणाबाबत सूचना देण्यात याव्या.

लसीकरणामुळे मृत्यूच्या प्रमाणात घट होत असल्याने लसीकरणावर विशेष भर द्यावा. ग्रामीण भागात 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचे प्रमाण चांगले आहे तर शहरी भागात कमी आहे. ग्रामीण भागातील शाळांमधून लसीकरणाची सुविधा दिल्याने हे प्रमाण वाढले असल्याने  महापालिका क्षेत्रातील शाळांमधून फिरत्या लसीकरण केंद्राद्वारे लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.

लसीकरण वाहनासोबत वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. संस्थाचालकांनी शाळेत कोविड नियमांचे पालन होईल आणि पात्र विद्यार्थ्यांचे 100 टक्के लसीकरण होईल याची दक्षता घ्यावी. विद्यार्थी शाळेतदेखील मास्कचा वापर करतील याकडे विशेष लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.

मास्क आवश्यकच !

मास्क न वापरण्याविषयी मंत्रीमंडळ बैठकीत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, अद्यापही कोविडचे संकट असल्याने नागरिकांनी मास्क वापरणे आणि मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे आवश्यकच आहे. नागरिकांनी संसर्गापासून बचाव करण्यासाठी चांगला मास्क वापरावा. मास्क न वापरणाऱ्यांविरोधात कारवाई सुरूच ठेवावी, असे त्यांनी सांगितले.


संबंधित लेख

लोकप्रिय