मुंबई : गेल्या आठवड्यापासुन राज्यातील एक लाख साठ हजार कामगार आपण बेरोजगार होण्याची भीती व्यक्त करत होते, परंतु महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटना फेडरेशन सीटूच्या शिष्टमंडळाने राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना लेखी निवेदन देऊन चर्चा केली. त्यावेळी स्वयंपाकी आणि मदतनीस या कायम राहणार असुन त्यांचे काम जाणार नाही, असे आश्वासन शिष्टमंडळाला शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दिले आहे.
डहाणुचे आमदार विनोद निकोले यांचे सचिव शहारूख मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली लेखी निवेदन देऊन चर्चा केली असता प्रा. ए बी पाटील यांनी सांगितले की, बिस्कीटामधुन केवळ कर्बोदके मिळतात, जिवनसत्वे आणि फॅट्स मिळत नाहीत आणि बिस्किटे खाऊन पोट भरत नाही. त्यासाठी मुलांना ताजे व गरम आहार सर्वाच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शाळेतच दिला पाहिजे, असे सांगितले. त्यावर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्या की, शाळेतच मुलांना ताजी खिचडी भेटणार आहे. त्यामुळे संघटनेचे पदाधिकारी व कामगारांनी समाधान व्यक्त केले आहे.
या शिष्टमंडळामध्ये राज्यध्यक्ष कॉ. प्रभाकर नागरगोजे, केंद्रीय कमिटी सदस्य प्रा. ए बी पाटील, सरचिटणीस कॉ. मधुकर मोकळे, राज्य सचिव डॉ अशोक थोरात, कॉ. मिरा शिंदे, कॉ. कुसुम देशमुख, कॉ. अनिल मिसाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.