या भूतलावर खूप वर्षे जगणारे तीन कल्पवृक्ष आहेत म्हणजेच वड, पिंपळ आणि उंबर ! या तिन्ही वृक्षाभोवती स्त्रियांनी एक निसर्ग संस्कृती निर्माण केली आहे. प्रत्येक धर्मग्रंथांत वडाच्या झाडाला ईश्वराचा पहिला प्रतिनिधी असे म्हटले आहे.
स्त्रियांनी शेतीचा शोध लावला आहे. अतिशय तप्त उन्हाळ्यामुळे थकलेल्या पतीला वडाच्या पारावर भाकरीचा घास देणारी सावित्री आजही गावोगावी पाहायला मिळते. सावित्रीची अनेक रूपे आहेत, कधी ती कन्या असते, कधी माता, आणि सौभाग्यवती असते.
कोणत्याही मुलाने केलं नसेल असं कुटुंबाचं कल्याण आपल्या पुण्याईने व बुद्धिचातुर्याने ती करत असते. मृगाचा पहिला पाऊस आल्यावर धरती शांत आणि हिरवीगार होते. प्राचीन काळी भारतात गावोगावी वडाचे मोठे पार आणि देवराया होत्या. वडाची पिंपळाची झाडे थंडगार सावली देत असत. त्यापैकी वडाच्या झाडाला पौर्णिमेला फेर धरून त्याची पूजा करणाऱ्या सावित्रीच्या लेकी अखंड सौभाग्य लाभावे यासाठी प्रार्थना करतात.
प्रचंड बुद्धिमता असलेल्या सावित्रीने यमाशी वादविवाद घालून अल्पायुषी सत्यवानाला जीवदान मिळवून दिले, या रूपक आख्यायिकेचा अर्थ असा आहे की, जीवनात येणाऱ्या सर्वच संकटांना स्त्री समर्थपणे तोंड देते. वडाचे झाड सर्वत्र प्राणवायू देते, प्रत्येक घरातील स्त्री ही कुटुंबाचा प्राणवायू असते. वडाच्या झाडासारखे तिचे विशाल हृदय असते. ती परिवारातील सर्व सदस्यांना सुखाचा घास देते. वडाच्या झाडासारखी तिची सावली कुटुंबावर असते. ती उन्हामध्ये पतीबरोबर कष्ट करते. ती मृगाच्या पावसात शेतामध्ये लावणी लावते. या वटपौर्णिमेतून स्त्री स्वातंत्र्याचा, स्त्री शक्तीचा महिमा जाणून घेतला पाहिजे, त्याप्रमाणे कुटुंबातील, समाजातील मुली-स्त्रिया खऱ्या अर्थाने सक्षम झाल्या पाहिजेत.
स्त्रियांच्या क्षमता वडाच्या झाडासारख्या आहेत, त्यांची उन्नती करण्यासाठी पुरुषांनी पण वडाच्या झाडाला किमान सात फेरे मारले पाहिजेत. पुराण कथेतील वास्तवता आणि आजच्या काळात तिची उपयोगिता लक्षात घेऊन नव्या समाजाच्या निर्मितीसाठी स्त्रियांना आत्मसन्मान दिला पाहिजे. पुरुष हे सत्यवानाचे प्रतीक समजले जाते. आधुनिक भारतातील सत्यवानांनी या दिवशी वटवृक्षाची लागवड करून त्याचे संवर्धन करण्यासाठी कटिबद्ध झाले पाहिजे. प्रत्येक घरात एक मुलगी असावी, आसपास कुठेतरी वडाचे एक झाड असावे, ही काळाची गरज आहे. तरच हे जगणे पौर्णिमेच्या चंद्रा प्रमाणे शीतल होईल.
– क्रांतिकुमार कडुलकर, पुणे