श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संघाच्या वतीने आवाहन
आळेफाटा / रवींद्र कोल्हे : अखिल विश्वाला श्रमप्रतिष्ठेचा संदेश देणाऱ्या आद्यसंत संत शिरोमणी सावता महाराजांचा ७२६ वा संजीवन समाधी पुण्यतिथी महोत्सव १ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट दरम्यान असून राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता भाविक भक्तांनी त्यांच्या गावातच कोविडच्या नियमांचे पालन करून उत्सव साधेपणाने विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करावा, असे आवाहन श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संघाच्या वतीने पुणे जिल्हा अध्यक्ष विशाल महाराज गडगे यांनी केले आहे.
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. म्हणून या भूमीला खर्या अर्थाने संत परंपरेचे अनुष्ठान लाभले आहे. संत परंपरेमुळे महाराष्ट्राला समृद्ध वैचारिक वारसा लाभला आहे. याच माध्यमातून हा वारकरी संप्रदाय खर्या अर्थाने संपूर्ण जगभरात पोहोचायला मदत झाली. संत शिरोमणी सावता महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत तुकाराम महाराज, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत सोपानदेव यांच्यासोबतच अनेक संतांनी आपल्या अभंग, ओव्या,भारूडे यांच्या निरुपणातून समाजाला एक सकारात्मक दिशा देण्याच काम केलं. याच जाणीवेतून महाराष्ट्रात शेकडो वर्षांची परंपरा असलेले अखंड हरिनाम सप्ताह आजतागायत चालू आहेत.
संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त दरवर्षी महाराष्ट्रातील बहुतांश गावांमध्ये अखंड हरिनाम सप्ताह पार पडतात. यामध्ये काकडारती, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, प्रवचन, हरिकिर्तन, आदि सांप्रदायिक कार्यक्रम संपन्न होत असतात. मात्र सध्या कोविडच्या पार्श्वभूमीवर नित्य पूजा व परंपरेचे सांप्रदायिक कार्यक्रम करून हा पुण्यतिथी सोहळा साध्या पद्धतीने शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करुन साजरा करण्यात यावा. त्याचप्रमाणे रक्तदान, नेत्र तपासणी शिबिरे, कोरोना जनजागृती, शैक्षणिक व भौतिक सुविधा, आर्थिक व दुर्बल घटकांना मदत आदि विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा करावा तसेच या कोरोनाच्या संकटात सर्वानी आपली आणि आपल्या कुटुंबाची व मित्रपरिवाराची काळजी घ्यावी असे आवाहनही गडगे यांनी केले आहे.