आ. दिपक साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला पदाधिकारी यांचा स्तुत्य उपक्रम
सांगोला (अतुल फसाले) : कोरोनामुळे सर्वच सण-उत्सवावर बंधने आली आहेत. तर संसर्गाच्या भीतीमुळे सार्वजनिक कार्यक्रम व नातेवाइकांकडे येणे-जाणे देखील अनेकांनी बंद केले आहे. मात्र, लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग व प्रशासनातील इतर कर्मचारी अहोरात्र आपले कर्तव्य पार पाडत आहेत. यामध्ये, बहिणीकडे जाऊन रक्षाबंधनाचा सण साजरा करता आला नाही, अशा पोलिस बांधवांना राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी राखी बांधून सण रक्षाबंधनचे पवित्र पर्व साजरे केले आहे.
रक्षाबंधन कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवानेते डॉ. पियुष साळुंखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला तालुकाध्यक्ष सखु वाघमारे, विधानसभा अध्यक्ष सुचिता मस्के, शहराध्यक्ष शुभांगी पाटील, जयश्री पाटील आदी उपस्थित होते. कात्यायणी साळुंखे पाटील व इतर महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीसांना राखी बांधून औक्षण केले. बंदोबस्तावरील पोलिसांना सण साजरे करण्याचे प्रकार दुर्मिळच म्हणावे लागतील. यामध्ये दि. २२ ऑगस्ट रोजी भावा-बहिणीच्या प्रेमाचा राखी पौर्णिमेचा सण सर्वत्र साजरा करण्यात आला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राखी बांधून अगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला.
राखी पौर्णिमेनिमित्त शहरातील पोलिस ठाण्याला भेट दिली. येथील उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी औक्षण करीत राख्या बांधल्या. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी महिला पदाधिकारी यांच्या या उपक्रमामुळे पोलिस बांधव देखील भारावून गेले. पोलिस बांधव २४ तास समाजाचे रक्षण करतात. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राखी पौर्णिमेनिमित्त कर्तव्यावर असणाऱ्या पोलिस बांधवांना देखील सण साजरा करता यावा म्हणून त्यांच्या हातावर राखी बांधली.
आपल्या शहर व तालुक्यातील सर्व माता भगिनीचे आजपर्यंत आपण सख्या भावाप्रमाणे रक्षण केले आहे. तसेच रक्षण यापुढील काळात ही करावे, अशी ओवाळणी यावेळी मागितल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला तालुकाध्यक्ष सखु वाघमारे यांनी सांगितले.
यावेळी शहराध्यक्ष शुभांगी पाटील म्हणाल्या, तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था असो अथवा महिलांचे संरक्षण यासह कोरोना विषाणूला रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाचे योगदान मोलाचे आहे. पोलीस बांधवांनी व आरोग्य यंत्रणेने केलेले कार्य निश्चितच अविस्मरणीय असणार आहे. त्यानिमित्ताने त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही आज कर्तव्यावर असणाऱ्या प्रत्येक बांधवांना देवाचा दर्जा देत आहोत. कारण मदतीला देव धावतो आणि देवाच्या रूपांमध्ये आज हे आमचे बांधव धावले आहेत अशी भावना व्यक्त करीत पोलिस बांधवांना त्यांनी औक्षण केले.