चर्चा सकारात्मक झाल्याने साखळी उपोषण मागे, पण निवाडा नोटीस मिळेपर्यंत धरणे आंदोलन सुरूच – किसान सभा
सांगली : महामार्ग बाधित शेतकर्यांच्या प्रश्नांबाबत शिरढोण तालुका कवठेमहांकाळ येथे सुरू असलेल्या धरणे आंदोलकांची प्रांताधिकारी यांच्या बरोबर बाधित शेतकर्यांच्या प्रश्नांबाबत बैठक पार पडली.
बैठकीत फेर सर्वे झालेल्या बाधित शेतकर्यांच्या निवाडा नोटीस बाबत चर्चा झाली. त्याचबरोबर शिरढोण येथील नव्याने बाधीत बांधकामाबाबत व बाधीत क्षेत्राबाबत बाधीत बोअरवेल पाईपलाईन फळझाडे याबाबत निवाडा नोटीस मिळण्या संबधी सकारात्मक चर्चा झाली. सर्व बाधीत बाबींचे मूल्यांकन प्राप्त होऊन मंजुरीसाठी नॅशनल हायवे ऑफिस कडे पाठविण्यात आले आहे. लवकरच निवाडा नोटीस मिळतील, असे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी सांगितले. यावेळी आंदोलन स्थगित करावे, अशी विनंती प्रांताधिकारी यांनी केली.
किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड उमेश देशमुख यांनी सांगितले, आम्ही सर्व बाधित शेतकर्यांशी चर्चा करून आपणास कळवितो. शिरढोण येथे सुरू असलेल्या धरणे आंदोलन ठिकाणी सर्व बाधित शेतकर्यांच्या बरोबर किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. सकारात्मक चर्चा झाल्याने आपण 23 मार्च शहीद भगतसिंग स्मृतिदिना पासून सुरू असलेले साखळी उपोषण स्थगित करावे, आणि जोपर्यंत निवाडा नोटीस मिळणार नाहीत तो पर्यंत धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी किसान सभेचे जिल्हा सरचिटणीस कॉम्रेड दिगंबर कांबळे, रजनीकांत पाटील, सागर पाटील, अमित पाटील, प्रदीप पाटील, विनायक सुर्यवंशी, गोरख सुर्यवंशी, प्रमोद सुर्यवंशी, सचिन करगने, बाळासाहेब पाटील, रावसाहेब पाटील, लक्ष्मण चौगुले, वसंत कदम व इतर बाधीत शेतकरी उपस्थित होते.