Sunday, July 14, 2024
Homeजिल्हापेठ आणि दिंडोरी तालुक्यातील विविध विकासकामांसंदर्भात आढावा बैठक, झिरवाळ यांनी दिल्या "या"...

पेठ आणि दिंडोरी तालुक्यातील विविध विकासकामांसंदर्भात आढावा बैठक, झिरवाळ यांनी दिल्या “या” सूचना

मुंबई (सुशिल कुवर) : पेठ आणि दिंडोरी तालुक्यातील रस्ते आणि विविध पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक नियोजन करावे, अशा सूचना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी येथे दिल्या.

उपाध्यक्ष झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली पेठ आणि दिंडोरी तालुक्यातील विविध विकास कामांबाबत आढावा बैठक विधान भवनात झाली. त्यावेळी झिरवाळ म्हणाले, पेठ आणि दिंडोरी तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी प्रयत्न करावे. आरोग्य यंत्रणेच्या जीर्ण झालेल्या इमारतींचे निर्लेखन करावे. नवीन आरोग्य उपकेंद्राची मागणी येत आहे मात्र याबाबत फेर सर्व्हेक्षण करावे. उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तलाठी आणि सर्कल कार्यालयांचे नूतनीकरण करावे. नूतनीकरण करताना नागरिकांच्या सोयीचा प्राधान्याने विचार करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

पेठ आणि दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांची ठिबक सिंचनासाठी मागणी असते. त्यामुळे ठिबक सिंचनासाठी जास्तीत जास्त निधीची तरतूद करावी. खतांचा पुरवठा सुरळीत राहील, यांची काळजी घ्यावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

पेठ आणि दिंडोरी तालुक्यातील बहुतांश गावे जंगलात आहेत. या गावांचे पोहोच रस्ते उत्तम दर्जाचे करावे. हे रस्ते करण्यासाठी वन विभागाने नियमांचे पालन करुन परवानगी द्यावी. वनसंपदेला धक्का न लावता बंधारे करावे. पाण्याचे जास्तीत जास्त स्त्रोत निर्माण करावे, अशी सूचना त्यांनी केली.

पेठ येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयासाठी मैदान आणि संरक्षक भिंत करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. या शाळेतील मुली क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी करु शकतात. त्यांच्यात गुणवत्ता आहे. या शाळेला क्रीडांगण आणि संरक्षक भिंत करण्यासाठी निधी द्यावा, अशा सूचना झिरवाळ यांनी दिल्या.

या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य भास्कर भगरे, कांदवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, उपवनसंरक्षक पंकज धर, दिंडोरीचे उपविभागीय अधिकारी संदीप आहेर, उपवनसंरक्षक तुषार चव्हाण आदी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय