Wednesday, April 24, 2024
HomeNewsलक्ष्मण जगताप यांच्याबद्दल आदर, परंतू चिंचवडची पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय राज्यपातळीवरून अंतिम होईल...

लक्ष्मण जगताप यांच्याबद्दल आदर, परंतू चिंचवडची पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय राज्यपातळीवरून अंतिम होईल – अजित गव्हाणे

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे पिंपरी-चिंचवड शहराचे लोकनेते होते. त्यांच्या निधनाचे आम्हालाही दुख: असून त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे. परंतू भाजपविरोधातील जनभावना आणि राज्यात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपने घेतलेली स्वार्थी भूमिका लक्षात घेऊन चिंचवड विधानसभेची पोटनिवडणूक लढविण्याची भूमिका स्थानिक पातळीवर घेण्यात आली असून अंतिम निर्णय वरिष्ठ नेते घेणार आहेत. राज्यपातळीवर जो निर्णय घेतला जाईल त्यानुसार पुढील दिशा ठरविली जाईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी दिली आहे.

भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या वतीने चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याबाबतची पत्राद्वारे विनंती केल्यानंतर गव्हाणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याबाबत त्यांनी एक निवेदन जारी केले असून त्यात म्हटले आहे की, दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. ते सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जगताप यांना वेळोवेळी मदत केली होती. नगरसेवक, महापौर, आमदार बनविण्यामध्ये राष्ट्रवादीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. हे सर्वांनाच माहित आहे. जगताप यांचे निधन झाल्यामुळे चिंचवडची पोटनिवडणूक होत आहे.

यापूर्वी पंढरपूर,कोल्हापूर, देगलूर येथील आमदार दिवंगत झाल्यावर तेथील निवडणुका बिनविरोध व्हाव्यात अशी राष्ट्रवादीची अपेक्षा होती.मात्र भाजपने तिथे बिन विरोध निवडणूका होऊ दिल्या नाहीत.
तर मुंबईमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला त्रास देऊन नोटाचा प्रचार करण्याची भूमिका घेतली. विरोधी पक्षांच्या आमदारांचे निधन झाल्यानंतर वेगळी भूमिका आणि आपल्या पक्षाच्या आमदाराचे निधन झाल्यानंतर भावनिक आवाहन करून निवडणूक बिनविरोध करण्याबाबत भूमिका घेणे हा स्वार्थी प्रकार आहे. भाजपविरोधात शहरातील जनतेच्या भावनाही तीव्र आहेत.

महापालिकेत गेल्या पाच वर्षांत भाजपचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी महापालिकेमध्ये चुकीचा कारभार केला. चिंचवडची निवडणूक बिनविरोध करणे म्हणजे चुकीच्या कामांना पाठींबा देण्यासारखे ठरू शकते. भाजपने यापूर्वी चुकीची आणि स्वार्थी भूमिका घेऊन पोटनिवडणुका लढविल्यामुळे शहरातील पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावनाही तीव्र असून स्थानिक नेतेमंडळींनी पोटनिवडणूक लढविण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. आमच्या भावना आम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचविल्या असून पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो अंतिम असणार आहे, असेही गव्हाणे यांनी म्हटले आहे.

जगताप कुटुंबियांबद्दल आदरच
दिवंगत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटूंबाबद्दल मला व माझ्या पक्षाच्या प्रत्येकाला आदर आहे. त्यामध्ये कोणतेच दुमत नाही. भाजपने यापूर्वी पोटनिवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकेला आमचा विरोध आहे. त्यामुळे जगताप कुटुंबियांचा आदर कायम ठेवत निवडणूक लढविण्याची भूमिका स्थानिक पातळीवरील नेत्यांनी घेतलेली आहे. शहराध्यक्ष म्हणून महेश लांडगे यांनी घेतलेली भूमिका देखील स्वागतार्ह आहे. परंतू वरीष्ठ पातळीवरील नेत्यांचा निर्णय अंतिम राहणार असल्याचेही गव्हाणे यांनी या पत्रात म्हटले आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय