Thursday, April 25, 2024
HomeNewsआळंदी नगरपरिषदेची ‘माझी वसुंधरा' अभियानात लक्षवेधी यश

आळंदी नगरपरिषदेची ‘माझी वसुंधरा’ अभियानात लक्षवेधी यश

८१ व्या स्थानावरून ३८ व्या क्रमांकावर मजल

आळंदी / अर्जुन मेदनकर
: राज्य शासनाच्या माध्यमातून एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत पृथ्वी, वायू, जल, अग्नी , आकाश या पंच तत्वांवर आधारित माझी वसुंधरा हे शासनाचे महत्वाकांक्षी अभियान राज्यभर अमृत शहरे, नगरपरिषदा, नगरपंचायती, ग्रामपंचायती स्तरावर राबविण्यात आले. यात राज्यातील २५ ते ५० हजार लोकसंख्येच्या गटातील एकूण ११७ नगरपरिषदांत आळंदी नगरपरिषदेने मागील वर्षीच्या तुलनेत ८१ व्या स्थानावरून प्रगती करत ३८ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. येत्या वर्षभरात या अभियानात पहिल्या दहाचे आत आळंदीस आणण्याचा मनोदय येथील कार्यरत सेवाभावी व्यक्ती, संस्थानी व्यक्त केला आहे.



राज्य शासनाद्वारे पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल, पर्यावरणाची होत असणारी हानी रोखण्यास माझी वसुंधरा अभियान शासनाने सुरू केले आहे. यात आळंदी नगरपरिषदे मार्फत वसुंधरा लीग, सायकल रॅली, इ बाईक रॅली, शहरातील शाळा व महाविद्यालये यामध्ये पर्यावरणा संबंधी विविध स्पर्धांचे आयोजन, वसुंधरा दूतांच्या निवडी यांसारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून शालेय, कॉलेज च्या विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. तसेच शहरातील नागरिकांमध्ये पाणीबचत, विज बचत, अपारंपरिक ऊर्जा, कचरा विलगीकरण ,फटाके बंदी व पर्यावरण पूरक उत्सव साजरे करण्यास प्रोत्साहन यासारख्या विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.

माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठी आळंदी नगरपरिषदेने केलेल्या कामाची दखल घेत पर्यावरण दिना दिवशी जाहीर करण्यात आलेल्या निकालात २५ ते ५० हजार लोकसंख्येच्या गटातील एकूण ११७ नगरपरिषदांत आळंदी नगरपरिषदेने राज्यात ३८ वा क्रमांक मिळविल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले.



अभियान यशस्वी रित्या राबविण्यासाठी आळंदी नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी अंकुश जाधव आणि विद्यमान मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आरती पाटील, शीतल जाधव, संतोष पाटील, किरण आरडे, प्रज्ञा सोनावणे, अक्षय शिरगिरे, संजय गिरमे, साधना शिंदे, किशोर तर्कासे,सचिन गायकवाड,राम खरात, मुकादम मालन पाटोळे, रोहन जगदाळे यांचेसह नगरपरिषद कर्मचारी, नगरपरिषद शाळांचे सर्व मुख्याद्यापक, शिक्षक वृंद, पर्यावरण दूत, शहरातील सुजाण नागरिक यांनी विशेष योगदान दिले.

तत्कालीन मुख्याधिकारी अंकुश जाधव यांचे योगदान उल्लेखनीय या संदर्भात तत्कालीन मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी या अभियाना अंतर्गत राबविलेले उपक्रम, उपाय योजना आणि त्यात पुढे सातत्य राखणारे नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, शाळांचे शिक्षक वृंद, पत्रकार बंधू, तसेच आळंदीतील सामाजिक बांधिलकी जोपासत सेवारत सेवाभावी संस्था, जागरूक नागरिक या सर्वांचे हे सांघिक यश आहे. येत्या वर्षात जास्तीत जास्त नागरिक विशेषतः तरुण वर्गास अभियानात सहभागी करण्याचा प्रयत्न केला जाईल असे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी सांगितले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय