धर्म दुबळ्या माणसाला भ्रामक सुख, आभासात्मक सुख देतो. त्याची ती गरज आहे. धर्माच्या रुपाने व्यक्त होणारे दुःख हे एकाच वेळी ख-या दुःखाचे प्रकट रुप असते आणि त्याच वेळी तो ख-या दुःखाचा निषेधही असतो. धर्म हा दबलेल्यांचा, दीनदुबळ्यांचा आवाज असतो. धर्म हृदयशुन्य जगाचे हृदय असते. धर्म हा निरुत्साही परिस्थितीतला उत्साह असतो. धर्म लोकांची अफू आहे. खरे सुख न देता, तो अफूसारखी गुंगी देतो. असे कार्ल मार्क्सने त्याच्या दास कॅपिटल या ग्रंथात धर्माचे विवेचन केले आहे.
श्रद्धायुक्त धर्माचरण हे ऐहिक वा पारलौकीक हिताकरिता घडते केवळ पारलौकीक हिताकरिता घडत नाही. विशेषतः प्राथमिक अवस्थेतील समाजांत ऐहिक हितच महत्त्वाचे असते आर्थिक संबंध आधिक महत्त्वाचे असतात. कायम दारिद्र्य आणि पिळवणूक आपल्या वाट्याला का आली? याचे विश्लेषण करण्याइतके अगाध ज्ञान माणसाकडे नव्हते आजही नाही. गाढ अज्ञान यांमुळे अनपेक्षित वा अपेक्षित संकटाच्या भयाने तो कायम ग्रस्त झालेला असतो. अशी मांडणी कार्ल मार्क्स याने केली आहे. त्याने युरोपातील विदारक गरिबी का आहे, याचा अभ्यास करण्याआधी भौतिक विचारसरणीतून त्याने जग पाहिले. टोळ्या टोळ्यांमधील वर्चस्वाच्या लढाया पाषाण युगाच्या उत्तरार्धात झाल्या. त्या आधी उंच डोंगरावर गुहेत राहून फळे कंदमुळे तो खात होता. त्याच कालखंडात फक्त स्त्री आणि पुरुष याशिवाय अन्य कोणतीही नाती गोती गणगोत नव्हते. शाकाहार पुरेसा मिळत नव्हता आणि त्याने दगडाच्या आणि लाकडी दांड्या वापरून प्राण्यांची शिकार सुरू केली.
सूर्योदय व सूर्यास्त, पावसाळा, हिवाळा व उन्हाळा, तारांगणाने. भरलेले गगन, विजेचा लखलखाट, अनपेक्षित रीतीने येणारा पर्जन्य इ. सृष्टीतील घटना त्याच्या आश्चर्याचे कायम विषय असतात. अवचित व अनुकूल घटनांनी तो उत्साहितही होतो परंतु भयभावनेचा पगडा त्याच्यावर कायमच राहतो. निसर्गावर विजय मिळविणारी विज्ञान व तंत्र ही साधने विज्ञानयुगापूर्वीच्या स्थितीत अत्यंत अपुरी होती. भीतीतून अनामिक दैवी शक्ती आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांचेशी त्याने एकरूप होऊन नतमस्तक व्हायला सुरुवात केली. टोळ्या टोळ्यातील युद्धामुळे विजेत्याने स्वतःचा गण बनवला, आणि तिथून गणगोत सुरवात झाली.
आजच्या विज्ञानयुगातही सर्व साधनांची विपुलता असूनही भय शिल्लक राहतेच. आजचा प्रगत मानवी समाज विज्ञान आणि धर्म, देव, देवता यावर जास्त विश्वास ठेवतो.
त्यामुळे महापूर आणि वादळामुळे नुकसान झालेले लोक त्या त्या धर्माच्या देवाचे नाव घेतात. अमेरिकेतील ट्वीन टॉवर वर झालेल्या भीषण अतिरेकी हल्ल्यामुळे भयभीत झालेले अमेरिकन येशूचा धावा करत होते. अफगाणिस्तान, इराक वरील युद्धाच्या भीतीने सामान्य मुस्लिम बांधव अल्लाचे नाव घेत होते. कोरोनामुळे भीतीची छाया पसरलेल्या आपल्या देशात लोक ईश्वराची प्रार्थना करत होते. टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याची प्रतिक्रिया एका अनामिक आशावादामुळे निर्माण झाली.
अनुकूल वा प्रतिकूल महत्त्वाच्या घटनांचा निश्चित कार्यकारणभाव विज्ञानपूर्वयुगात इंद्रिय व बुद्धी यांच्या साहाय्याने निश्चितपणे कळत नाही तेव्हा माणूस भयातून पार पडण्याकरिता वा उत्साह वृद्धिंगत करण्याकरिता अलौकिक शक्तीची किंवा तत्त्वांची संकल्पना करून नैसर्गिक व सामाजिक घटनांचा, स्वतःशी संबंध असलेल्या विश्वाचा उलगडा करण्याचा प्रयत्न करतो. मूर्त पदार्थांत प्राणरूप किंवा आत्मरूप तत्त्वांची व आचरणात पाप-पुण्याची संकल्पना तो करतो. जीवात्मे, मृतात्मे, पितर, झपाटणारी भूते, घातक पिशाच, राक्षस वा असुर, मंगल आणि कल्याणकारक शक्ती असलेले अनेक देव किंवा एक देव, सजीव व निर्जीव वस्तूंतील पवित्र व अपवित्र सामर्थ्ये इ. अलौकिक तत्त्वे अथवा शक्ती अगम्य घटनांच्या उपपत्तीकरिता माणूस कल्पितो व त्यांच्यावर श्रद्धा ठेवतो. आपल्या साधनसामग्रीत व सत्-असत् आचरणातही अलौकिक किंवा अपूर्व शक्ती असते असे तो कल्पितो. ही उपपत्ती, माणूस हा मुख्यतः बुद्धिवादी (रॅशनल) आहे, या धारणेतून उत्पन्न झाली आहे.
हा लेख लिहिण्याचे कारण की आपण बऱ्याच वेळा व्हाट्सअप्प युनिव्हर्सिटीच्या पोस्ट वाचतो आजकाल हौशी कम्युनिस्ट किंवा ज्यांना बुद्धिवादी डावे म्हणूया ते नेहमीच धर्म ही अफूची गोळी आहे, जशी खाईल तशी नशा चढेल असे सांगतात आणि हे सर्व कार्ल मार्क्स च्या नावावर खपवले जाते.
मुळात कार्ल मार्क्स याच्या दास कॅपिटल च्या ग्रंथात धर्मावर विशेष जास्त पाने खर्च केलेली नाहीत. वैयक्तिक पातळीवर नास्तिक असलेले काही मनोविकारी लोक स्वतःला कम्युनिस्ट किंवा क्रांतिकारक समजतात, आणि पिळवणूक शोषण याविरोधात कसे लढावे या बद्दल गरळ ओकत असतात. कारण त्यांच्या डोक्यात वैचारिक अहंकार (INTELECTUAL EGO) असतो.
दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सुर्ये पाहो, जो जे वांच्चील तो ते लाहो हा ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील विचार म्हणजे मार्क्सवादाची अनुभूती आहे. कार्ल मार्क्सचा विचार समजून घेण्यासाठी खरे कम्युनिस्ट बसवेश्वर, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आधी वाचतात. निगेटिव्ह मनोविकार असलेले लोक क्रांती आणि कार्ल मार्क्सबद्दल बोलत असतील पण ते वस्तीतील कामगार आणि श्रमिकांच्या अंधारात दिवा घेऊन गेलेले नसतील.
धर्म चिकित्सा हा कम्युनिस्ट पक्षाचा कार्यक्रम नाही, किंवा सगळे नास्तिक असाल तर तुम्ही अन्याया विरोधात लढाल असे काही नाही। जगात 1917 साली कम्युनिस्ट क्रांती झालेल्या रशियाने तेथे कधीच चर्च किंवा धार्मिक स्थळे फोडलेली नाहीत. भारतातील जुन्या कम्युनिस्ट नेत्यांनी अनेक पुस्तके लिहिली मात्र त्यामध्ये शोषण करणाऱ्या वर्गा विरोधात लढा. त्या व्यवस्थे विरोधात लढण्यासाठी पीडितांच्या वस्तीत जाऊन त्यांना संघटित करा, असे सांगितले आहे. धर्माविरोधात लढा असे त्यांनी कधीच म्हटले नाही. कम्युनिस्ट चळवळी आणि सरकारे असलेल्या भारतातील राज्यात सर्व धर्माचे सण उत्सव कम्युनिस्टांनी साजरे केले आहेत.
उजव्या विचार सरणीचे गट नेहमीच कम्युनिस्टांना धर्म विरोधी ठरवतात मात्र त्यांना ते सिद्ध करता येत नाही. मशिदी, चर्च इ प्रार्थना स्थळे पाडून किंवा जाळून आपला धर्म टिकेल आणि देव प्रसन्न होईल हा कर्मठ विचार प्रभू राम आणि कृष्णाला मान्य होणार नाही. तद्वत धर्म ही अफूची गोळी आहे, आस्तिक असणे हा विचारांचा दोष आहे असे समजून काही विश्लेषण करणारे स्वयंघोषित क्रांतीकारक धर्मांध लोकापेक्षा अतिशय घातकी असतात.
मूर्ख आणि अविवेकी अनुयायामुळे महान व्यक्ती बदनाम होतात. धर्म जगण्यासाठी आणि कसे जगावे यासाठी एक व्यवस्था आहे. धर्मावर श्रद्धा असलेल्या माणसाला तू नास्तिक हो असे सांगितले तर तो काही दिवसांनी तुम्हाला दारूच्या गुटत्यावर बसलेला दिसेल. धर्मातील वाईट कर्मकांडे बाजूला काढली तर धर्म ही नवीन पर्याय मिळत नाही तो पर्यंत निश्चित चांगली व्यवस्था आहे.
कार्ल मार्क्स च्या विचाराने लढा देणाऱ्या व्हिएतनाम च्या कम्युनिस्ट पक्षाने आणि हो ची मिन्ह या नेत्याने 20 वर्षे अमेरिकन साम्राज्यशाही विरोधात लढा देतांना बौद्ध धर्माच्या तत्वज्ञानाला वेगळे केले नाही, आणि या लढाईत अमेरिकेचा निषेध करण्यासाठी अनेक बौद्ध भिक्षुनी व्हिएतनामच्या रस्त्यावर स्वतःला जाळून घेतले आहे.
आजही क्युबा सहित लॅटिन अमेरिका खंडातील देशातील अनेक चळवळीत कुठेही धर्मावर आघात केलेला नाही. पालघर, ठाणे, सोलापूर, नांदेड, विदर्भ इ महाराष्ट्रातील डाव्या चळवळीतील कम्युनिस्ट कार्यकर्त्यानी कोणत्याही धार्मिक यात्रा उत्सवावर बंदी घाला असे म्हटले नाही. अन्यायाविरोधात लढण्यासाठी धर्मातील अनेक संदर्भ उपयोगी पडतात.
धर्म गरिबी हटवू शकत नाही, धर्म भांडवलशाहीतील शोषण नष्ट करू शकत नाही हे निर्विवाद सत्य आहे. कारण धर्म उदयास आला तो कालखंड वेगळा होता. दान करा, दानशूर व्हा, गरीबाच्या पोटात अन्नाचा घास द्या असे सांगणार धर्म तत्वज्ञान आहे. धर्म विद्यमान शोषण करणारी व्यवस्था बदलू शकत नाही. मात्र धर्मांध लोक या व्यवस्थेचे आधार असतात.
कार्ल मार्क्सने हे जग अतिशय सुंदर आहे, त्याला अजून सुंदर बनवू असे प्रतिपादन केले आहे. कार्ल मार्क्स आजही जगभर वाचला जातो. त्रिपुरामध्ये कम्युनिस्ट सरकार जाऊन भाजप चे सरकार आले त्यांनी लेनिन यांचा पुतळा तोंडाला, खूप मोठी बातमी झाली आणि त्याच दिवशी गुगल वर कोट्यवधी भारतीयांनी लेनिनचा शोध घेतला.
कार्ल मार्क्स, लेनिन, संत तुकाराम महाराज, प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण यांची माहिती देणाऱ्या सर्वात जास्त वेबसाईट इंटरनेट वर आहेत. जग सतत बदलत आहे, आणि ते बदलत राहणार. मार्क्सवादाचा हा मूलभूत सिद्धांत आहे. सामान्य माणसाच्या जीवनात किमान पातळीवरची समृद्धी यावी, यासाठी काय करावे हा प्रश्न असतो, तेव्हा कार्ल मार्क्स याचे विचार दिपस्तंभा सारखे दिशा देतात.
– क्रांतिकुमार कडुलकर
– पुणे