मुरबाड : अनाधिकृत बांधकाम नियमित करा, अशी मागणी कोकण विभाग प्रमुख आणि बिरसा फायटर्सचे अध्यक्ष राजाभाऊ सरनोबत यांनी मुख्याधिकारी नगरपंचायत मुरबाड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मुरबाड नगरपंचायत हद्दीत बांधण्यात आलेले व्यापारी गाळे हे मेन रोड लगत जुने अस्तित्वात असताना नवीन स्वरुपात आले आणि शासन नियमावलीप्रमाणे दि. १८ ऑक्टोबर २०२१ रोजी बांधकाम नियमित करण्याबाबत पत्र देऊनही नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सदर राजकीय दबावाच्या आधारे सदर गाळेधारकांना कुठल्याही प्रकारची सहकार्य करत नसून शासन आदेशाची पायमल्ली करत असल्याचे जाणवत असल्याने संघटना याविरुद्ध तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा कोकण विभाग प्रमुख आणि बिरसा फायटर्सचे अध्यक्ष राजाभाऊ सरनोबत यांनी नगरपंचायत प्रशासनाला दिला आहे.
शासनाच्या आदेशानुसार आपल्या नगरपंचायतच्या हद्दीत असणा-या गाळेधारकांचे अर्ज मागवून त्याची छाननी करावे व मेन रोड लगतचे अनाधिकृत बांधकाम नियमित करण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी राजाभाऊ सरनोबत यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देतेवेळी राजाभाऊ सरनोबत कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा फायटर्स यांच्यासह अनेक बिरसा फायटर्स कार्यकर्ते उपस्थित होते.