कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेतर्फे देण्यात येणारा रत्नाकर काव्य पुरस्कारासाठी दिपक बोरगावे यांच्या भवताल आणि भयताल या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे, याबाबत माहिती दमसास चे अध्यक्ष धुळुंबुळू यांनी दिली. पुरस्काराचे स्वरुप रुपये रुपये पाच हजार, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे.
पुरस्कार प्रदान समारंभ गुरूवार दि. २५ मे २०२३ रोजी सकाळी १०:३० वाजता कोल्हापूर च्या शाहू स्मारक भवनाच्या मिनी हॉलमध्ये होणार आहे. दीपक बोरगावे हे इंग्रजी विषयाचे माजी प्राध्यापक असून त्यांनी विविध पुस्तकांचे अनुवाद केले आहेत. त्यांच्या कवितांतून भवतालचे भयाण वास्तवाची दहाकता समजते. त्यांनी ‘गुजरात फाईल्स’ या सुप्रसिद्ध पुस्तकाचा मराठीत अनुवाद केला आहे.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर चे मराठी विभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे म्हणतात, इतिहासाविषयीची खोलवरची जाण हे दीपक बोरगावे यांच्या कवितेचे वैशिष्ट्य आहे. अर्थात त्यांच्या या इतिहासवाचनावर मार्क्सवादी इतिहासदृष्टीचा प्रभाव आहे. समाजेतिहास हा समतेचा आणि वर्गविहीन नाही. इतिहासाचा वापर प्रभुत्व संबंधांसाठी कायम केला आहे. त्यामुळे इतिहास काळाची एक वेगळी दृष्टी या कवितेत आहे. या समाजेतिहासाची पाहणी भुतकाळ आणि वर्तमान काळाने साधलेली आहे. यादृष्टीने बोरगावे यांच्या कवितेत ‘गावपाहणी’ वैशिष्ट्यपूर्ण ठरली आहे. अर्थात ही गावपाहणी गतस्मरणरंजनतेची नाही. ती बदलाच्या, परिवर्तनाच्या बिंदूतून पाहिली आहे.
गावाच्या दृश्य पलटाबरोबर झालेल्या मानसिक बदलांची चित्रे त्यात आहेत. ‘हे गाव कोणाचे?’ अशा प्रश्न मालिकेची ही दृश्यचित्रे आहेत. मेंदूत आणि डोळ्यांत भूतकाळातील रुतून बसलेला स्थळावकाश आणि आत्ताच्या दृश्य पसाऱ्यातून बदल टिपले आहेत. डोळ्यांच्या खोबणीतील जुने गाव ती शोधू पाहते, परंतु तिला ते सापडत नाही. गावातील रस्ते आणि विविध तऱ्हेच्या दुकानाच्या उपस्थितीतून गावाचे चित्र रेखाटले आहे. कधी काळीचे उदारधर्मी सरमिसळीचे गाव आता हद्दपार झाले आहे आणि आता नव्या गोष्टींची सुरुवात झाली आहे. जागतिकीकरणाच्या काही खुणा, धर्माचे बाजारू हिंस्त्ररूप आणि तरुणांचे जग अधोरेखित झाले आहे. जुन्या काळातील साध्याशा अडगळीतील मंदिररूपांनी आता नवी जागा घेतली आहे. या दृष्टीबिंदूतून गाव न्याहाळले आहे.
रवींद्र दामोदर लाखे यांचे “भवताल आणि भयताल” या कविता संग्रहावरील परिक्षण
पाब्लो नेरुदांची आठवण घट्ट करणारा मराठी कवी म्हणजे दीपक बोरगावे. नेरुदा एक राजकिय नेता होते. ते साम्यवादी विचारसरणीचे किंवा आविष्कार स्वातंत्र्याचे उद्गाते होते. चिली या देशातील तानाशाही विरुद्ध बंड करणा-या या कवीला आपला जीव वाचविण्यासाठी देश सोडावा लागला. बोरगावेही आपल्या देशात सध्या चाललेल्या तानाशाहीच्या विरोधात सतत बोलत राहिलेत. त्यांची कविता बोलत राहिली आहे. नेरुदाच्या कविता जशी केवळ सामाजिक प्रतिक्रियेची नसते तशीच बोरगावेंची कविता आहे. ही कविता केवळ सामाजिक प्रचाराची नाहीय. त्यांच्या कवितेला कवितेचे असतेपण आहे..
उदा: गोध्रा २००२ ही कविता पहा.
पंधरा वर्षे झाली
ह्या झाडांचा खातमा करून.
रक्ताच्या थारोळ्यात भिजताहेत ती आजही.
भीती नाही ओसरली.
आजही नखांतून वाहताहेत लाटा.
डोळ्यांतील बुबुळांचा हाकारा
वाळवंटात थरथरत
साचलेल्या भिंतीत चिखल उमलतोय भवताली
आजही.
थडग्यात केस पिंजारलेली कौसरबी.
तिची पाच बोटे थडग्यावर रक्ताचे डाग
तिला अजूनही सांगायचे असावे काही
आजही.
डोंगरात सायरन सुरु आहेत
न्यायाधिशांचा ठोकळा
धूळमातीत गुंडाळलेले कागद
कैद तुरुंगात सांडलेले रक्त.
पंधरा वर्षे झाली.
नव्या खोडांना पालवी नाही
पानं नाहीत फुलं नाहीत फांद्या नाहीत.
वाळवंट फुटलेले खोड.
वाळूत तुडवल्या गेल्या लहान लहान कळ्या
इशरत जहां
कोवळ्या निष्पाप चेह-यात विझली ती.
पंधरा वर्षे झाली.
झाडं कोसळतच आहेत.
पाने कळ्या फुले पालवी
आणि वाळवंटही.
– दीपक बोरगावे
---Advertisement---
---Advertisement---
दीपक बोरगावे यांना ‘रत्नाकर काव्य पुरस्कार’ जाहीर
---Advertisement---
- Advertisement -