रत्नागिरी : अत्यावश्यक सेवा बंद करू नका, विनाकारण फिरणा-यांवर कडक कारवाई करा, अशी मागणी सुशीलकुमार पावरा कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती दल यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार यांच्याशी चर्चा करून अत्यावश्यक सेवा सुद्धा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अचानक निर्णय झाल्याने सध्या अत्यावश्यक सेवेत मोडणा-या दुकाने, दूधवाले, मेडिकल इत्यादीशी संबंधीतांचा मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. अत्यावश्यक सेवेच्या नावाने अनावश्यक फिरणा-या व अधिक प्रमाणात लोक बाहेर फिरू लागल्याने हा निर्णय घेतल्याचे कळते. लोकांच्या गरजेनूसार फोनवर घरपोच सामान पुरवले जाईल, असे यात म्हटले आहे. मात्र घरपोच पार्सल सेवा ही प्रत्येक दुकानदार एवढ्या जास्त लोकांना कशी काय पुरवेल? आणि सामान्य जनतेला घरपोच सामान घेणे परवडणार नाही. कारण वस्तूंचे पैसे व डिलीवरीचे पैसे असे डबल खर्चा सामान्य जनतेला परवडणारा नाही.
त्यामुळे अत्यावश्यक सेवा बंद न करता जे विनाकारण बाहेर फिरताना दिसतील किंवा कोरोनाचे नियम पाळणार नाहीत, जे सरकारच्या आदेशाचे पालन करीतच नाहीत अशांवर कडक कारवाई करा. जेणेकरून अत्यावश्यक सेवेच्या नावाने होणारी बाजारातील गर्दी कमी होईल. अत्यावश्यक सेवा न मिळाल्यास जनतेचे हाल होतील. म्हणून अत्यावश्यक सेवा सुरूच ठेवाव्यात. अशी मागणी पावरा यांनी केली आहे.