उनाडक्या, खोड्या बंद होणार असल्याने पालकांनी टाकला सुटकेचा निःश्वास…
वांगणसुळे : सुरगाणा तालुक्यातील इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या ३१६ जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आल्याचे गटशिक्षणाधिकारी धनंजय कोळी यांनी माहिती दिली.
शासन निर्णयानुसार १ ली ली ते ४ थी चे वर्ग सुरू करण्यात आले. यावेळी कोविड १९ ची उपाययोजनांची अंमलबजावणी करून आज प्रत्यक्ष शाळेला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी शाळेत शिक्षक, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्या वतीने विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
सध्या राज्यातील कोरोना संकट आटोक्यात आले असल्याने राज्य शासन व जिल्हा परिषद नाशिक यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार इयत्ता पहिली ते चौथी वर्गाच्या शाळा सुरु केल्या असून सोमवारी तब्बल दिड वर्षानंतर विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. आदिवासी भागातील मुले दीड वर्षापासून ऑफलाईन शिक्षण सुरु असल्याने प्रत्यक्ष वर्गात न बसता ओट्यावर, मंदिराच्या पारावर, सभामंडप अशा ठिकाणी बसत शिकत होते. ऊन, थंडी, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता शिक्षण घेत होते. फावल्या वेळात मुले उनाडक्या करीत फिरत असल्याने केव्हा एकदाच्या शाळा उघडणार याकडे पालकांचे लक्ष लागले होते. याबाबत वारंवार पालक शिक्षकांना विचारणा करीत होते. या काळात हातात गलोल घेत जंगलात फिरत, नदीच्या डोहात अंघोळ करणे, रानोमाळ भटकंती करत पक्ष्यांवर नेम धरने , झाडावर चढत कै-या, चिंचा, बोरे, अळव, आवळे गोळा करणे, पालकांना शेतात मदत करणे, गुरे, शेळ्या, मेंढ्या चरायला घेऊन जाणे, लहान मुलांचा घरी सांभाळ करणे, घरकामात मदत, विहरी वरुन पाणी भरणे आदी कामे करावी लागत होती.
काही मुले तर उनाडक्या, खोड्या करत सैराट झाली होती. त्यामुळे पालकही हैराण झाले होते. शाळा सुरु झाल्याने मुले गुरुजींच्या ताब्यात गेल्याने पालकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरगाणा नं.२ येथे विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी नवोगतांचे स्वागत ढोल ताशा वाजवून करण्यात आले. शाळेच्या प्रवेशद्वारावर बिटाचे अधिकारी नरेंद्र कचवे, प्रभारी मुख्याध्यापक रतन चौधरी, चंदर चौधरी, सुधाकर भोये, सुनंदा गायकवाड, कमल पवार, भारती राऊत, भारती ठाकरे, मंगला बागुल, सुशिला चव्हाण यांनी कोरोना नियमांचे पालन करून गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले.
मागील दीड वर्षानंतर जिल्हा परिषद शाळेतील मुले प्रथमतःच शाळेत आलेली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेह-यावरील आनंद द्विगुणित झाला होता. तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतचे वर्ग सोमवार पासून सुरु करण्यात आले असून शाळेत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचा थर्मामीटर, ऑक्सिजन लेवल चेक करून सॅनिटायझरने, पाणी, साबणाने हात स्वच्छ करत विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबपुष्प, आणि चॉकलेट देऊन करण्यात आले. शाळेमध्ये सर्वत्र रांगोळी काढून प्रवेशद्वारावर फुगे, पाने, फुले, आंब्याच्या पानांचे तोरण लावण्यात आले.
कोरोनाचे नियम पाळत शाळेत येताना विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी. कोविड पासून बचाव करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत प्रभारी मुख्याध्यापक रतन चौधरी यांनी विद्यार्थ्यांना यांना मार्गदर्शन केले. गटशिक्षणाधिकारी धनंजय कोळी यांनी खोकरी जिल्हा परिषद शाळेत भेट देऊन विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन सत्कार केला. कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करावे अशा सूचना त्यांनी केल्या.