मुंबई, दि. २३ : पावसाळी अधिवेशनात कोरोना सेफ्टी किट आमदारांसहित इतर सर्व कर्तव्यावर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना द्यावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा आमदार तथा सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीटू) महाराष्ट्र राज्य सचिव कॉम्रेड विनोद निकोले यांनी विधानपरिषद सभापती व विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी आमदार कॉ. निकोले म्हणाले की, महाराष्ट्र विधिमंडळांचे पावसाळी अधिवेशन दि. 05 जुलै पासून सुरू होत असल्याचे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर प्रसार माध्यमांच्या बातम्यांतून समजले. त्यातूनच सदस्यांना एक किट देण्यात येणार असून त्यामध्ये एक फेस शिल्ड, मास्क, हॅडग्लोव्हज, हँड सॅनिटायझेशनची बॉटल देण्यात येणार आहेत, असे समजले. फक्त सदस्यांनाच का ? महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाले की, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस, राज्य राखीव पोलीस दल मधील सैनिक, विधिमंडळ सदस्यांचे स्वीय सहाय्यक, अंगरक्षक, वाहन चालक, पत्रकार, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय मधील आधिकरी – कर्मचारी, महाराष्ट्र शासन मंत्रालय आधिकरी – कर्मचारी उपस्थित असतात. यांचीही सुरक्षा आपली जबाबदारी आहे. कोरोना संसर्ग होऊन अनेक कर्मचाऱ्यांची जीव गेले आहेत. हे आपल्याला माहीतच आहे.
त्या अनुषंगाने विधिमंडळ सदस्यांसाहित इतर सर्व कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील कोरोना सेफ्टी किट देण्यात यावे अशी मागणी आ. निकोले यांनी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ तसेच विधानमंडळ सचिवालय प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.