पिंपरी चिंचवड : शाहूनगरच्या पाण्याच्या खाणीत विकासकामांचा राडारोडा टाकणाऱ्यावर दंडात्मक कठोर कारवाई करण्याची मागणी भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे उपप्रदेशाध्यक्ष शांताराम खुडे यांनी आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, चिंचवड शाहूनगर येथे पाण्याच्या खाणी आहेत. सदर खाणी मध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा, राडारोडा टाकू नये, असा आयुक्तांचा आदेश आहे. गेली वीस वर्षे या खाणी मध्ये पावसाच्या पाण्यामुळे जलसंवर्धन होत असल्यामुळे पर्यावर्णीय जैवविविधता निर्माण झाली आहे. या ठिकाणी फक्त गणेशमूर्ती विसर्जनाची परवानगी मनपाच्या देखरेखीखाली होते.
प्रभाग क्र.११ च्या परिसरात नागरी वस्तीमध्ये पेव्हिंग ब्लॉक बसवणे आणि रस्त्याची विकासकामे सुरू आहेत. त्यातून निर्माण होणारा राडारोडा, माती, सिमेंटकाम, टाकाऊ आणि नवीन पेव्हिंग ब्लॉक ई अनावश्यक कचरा या खाणीच्या तळ्यात टाकला जात आहे. तसेच उघड्यावर कचरा जाळला जात असल्याचेही म्हटले आहे.