पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – दिव्यांग बांधव हा समाजाचा अविभाज्य घटक आहे. त्यांच्या पंखांना बळ देऊन सक्षम आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. दिव्यांगांच्या कल्याणासाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये ठराविक निधी राखीव ठेवण्यात येईल, त्याबाबतचे आदेश लवकरच राज्य सरकारद्वारे काढण्यात येतील, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. (Purple jallosh)
दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणत त्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने पिंपरी चिंचवड महापालिका आणि दिव्यांग भवन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १७ जानेवारी ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत ‘पर्पल जल्लोष’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार उमा खापरे, अण्णा बनसोडे, अमित गोरखे, केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय सचिव राजेश अग्रवाल, महाराष्ट्र राज्याच्या दिव्यांग आयुक्तालयाचे आयुक्त प्रविण पुरी, पुणे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले, पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण महानगर आयुक्त योगेश म्हसे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, माजी महापौर योगेश बहल, माजी उपमहापौर डब्बू आसवानी, दिव्यांग भवन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, उप आयुक्त अण्णा बोदडे, तानाजी नरळे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, कंपनी सेक्रेटरी गिरीश परळीकर, सल्लागार विजय कान्हेकर, अभिजीत मुरूगकर, परांजपे स्कीमचे व्यवस्थापकीय संचालक शशांक परांजपे, युनिसेफ इंडियाचे प्रतिनिधी संजय सिंग, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, दिव्यांग संघटनांचे प्रतिनिधी मानव कांबळे, दत्तात्रय भोसले, राजेंद्र वाघचौरे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, महापालिका अधिकारी, कर्मचारी, नागरिक, माजी नगरसदस्य आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी तारे जमीन पर चित्रपट फेम अभिनेता दर्शिल सफारी याची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. (Purple jallosh)
PCMC Purple jallosh
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पर्पल जल्लोष कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचे मला समाधान मिळाले. असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. पर्पल जल्लोष हा असा उत्सव आहे, जो केवळ दिव्यांगांसाठी नाही तर समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, लोकप्रतिनिधी यांनीही पहावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हानुसार दिव्यांग व्यक्तींचा आढावा घेणार
राज्यातील एकूण लोकसंख्येच्या पाच टक्के लोकसंख्या दिव्यांगांची आहे. दिव्यांग व्यक्तींची एकूण संख्या किती आहे, यासाठी जिल्हानुसार दिव्यांगांचा आढावा घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने दिव्यांगांना आत्मनिर्भर बनवण्याचे काम सुरू केले आहे ते कौतुकास्पद आहे.
दिव्यांगांना योग्य मार्गदर्शन केले तर ते कर्तृत्वाचे शिखर कशा पद्धतीने गाठू शकतात हे पर्पल जल्लोष सारख्या कार्यक्रमातून दिसून येते. दिव्यांगांमध्ये आत्मविश्वास जागविण्याचे, प्रेरणा देण्याचे काम समाज म्हणून आपल्या सर्वांचे आहे, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
दिव्यांगांसाठी निधीची तरतूद करणार
राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात दिव्यांगांच्या विविध योजनांसाठी तरतूद केली जाईल. याशिवाय जिल्हा नियोजन समितीतून दिव्यांगांसाठीच्या विविध योजनांसाठी ठराविक निधीची तरतूद केली जाईल. आगामी काळात राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समितींमधील निधीचा काही भाग हा केवळ दिव्यांगांसाठी खर्च केला जाईल यासाठी राज्य शासनामार्फत स्वतंत्र आदेश काढण्यात येतील. याशिवाय राज्याने सुरू केलेल्या दिव्यांग विभागासाठी लवकरच अधिकारी व कर्मचारी यांची नव्याने नियुक्ती करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.
दिव्यांगांच्या प्रमाणापत्राबाबत महत्त्वाची घोषणा
सध्या पिंपरी चिंचवड मधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आणि पुण्यातील ससून रुग्णालयात दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र दिले जाते. उपजिल्हा रुग्णालयात देखील दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यात यावे, यासाठी आवश्यक ते निर्देश देण्यात येतील. तसेच ‘दिव्यांगांसाठी विशेष प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे, रोजगार कार्यक्रम घेणे, आरोग्य उपाययोजना करणे, यावरही भर दिला जाईल, असेही उपमुख्यंमत्री अजित पवार यावेळी म्हणाले. (Purple jallosh)
पर्पल जल्लोष उपक्रमाचे कौतुक
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रसंगी पर्पल जल्लोष कार्यक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमात असणारे स्वयंसेवी संस्थाचे स्टॉल, प्रदर्शन यांना त्यांनी भेट दिली. तसेच असा कार्यक्रम केवळ दिव्यांगांसाठी मर्यादित न ठेवता, याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
प्रास्ताविकात बोलताना पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह म्हणाले, शहरातील सर्व घटकांचा विचार करत असताना आपल्या दिव्यांग बांधवांच्या उत्कर्षासाठी तसेच त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महापालिका विविध योजना आणि उपक्रम राबविते.
दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना उपक्रम आणि प्रकल्पाचे सुसूत्रीकरण करण्यासाठी महापालिकेच्या वतीने फेब्रुवारी २०२४ मध्ये दिव्यांग भवन फाऊंडेशनची कायदेशीर स्थापना करण्यात आली. दिव्यांग भवनाच्या ४ मजली इमारतीमध्ये या फाऊंडेशनचे कामकाज चालते. याठिकाणी ४० प्रशिक्षित अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, थेरपिस्ट, शिक्षक, तज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यापैकी १० कर्मचारी हे दिव्यांग आहेत. याठिकाणी २१ प्रकारच्या दिव्यांगत्वावर मोफत सल्ला व मार्गदर्शन, विविध प्रकारच्या थेरपी, कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगार असे विविध उपक्रम फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू आहेत.
महापालिकेकडे शहरातील विविध प्रवर्गातील सुमारे ९ हजार ८२८ दिव्यांग नागरिकांची नोंद आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात ६ हजार ७३४ दिव्यांगांना महापालिकेच्या वतीने दरमहा २ हजार ५०० रूपये अर्थसहाय्य दिले जाते. तसेच २ हजार ३६७ मतीमंद आणि २८९ कुष्ठपिडीतांना दरमहा ३ हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते. दिव्यांगांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या उपयुक्त साधनांच्या खरेदीसाठी २१८ दिव्यांगांना प्रत्येकी १ लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात आले आहे.
घरकुल आणि PMRDA योजनेअंतर्गत आवास योजनेचा लाभ घेणाऱ्या ५० दिव्यांगांना प्रत्येकी १ लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात आले आहे. महापालिकेच्या वतीने दिव्यांगांना विवाहासाठी १ ते २ लाखांपर्यंत अर्थसहाय्य करण्यात येते. तसेच दिव्यांग व्यक्तींना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी १ लाख रुपये अर्थसहाय्य देखील देण्यात येते. याशिवाय फिरत्या वाहनावरील दुकान उपलब्ध करून देण्यासाठी वाहन उपलब्ध करून देणारी योजना देखील राबविण्यात येणार असून येत्या काळात दिव्यांग भवनच्या माध्यमातून दिव्यांगांसाठीचे सर्व प्रश्न सोडविण्यास महापालिका प्रयत्नशील असणार आहे. समान हक्क, समान संधी आणि संपुर्ण सहभाग हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन, दिव्यांगांचे अधिकार आणि त्यांचे हक्क त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे.
पर्पल जल्लोषसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील नोकरीच्या संधी शोधण्याचे काम महापालिका करणार आहे. अशाप्रकारे दिव्यांगत्वानुसार नोकरीच्या संधी शोधून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले जाणार आहे.
लहान मुलांमधील दिव्यांगत्वाचे शीघ्र निदान करण्यासाठी बालवाडी प्रकल्प दृष्टीक्षेपात ठेवलेला आहे. त्याचबरोबर शहरातील दिव्यागांची संख्या निश्चित करण्यासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पर्पल जल्लोषचा कार्यक्रम या सर्व गोष्टींसाठी महत्वाचा ठरणार असून या कार्यक्रमातील विविध उपक्रमांच्या मंथनामधून पुढील तीन वर्षांचा आराखडा दिव्यागांच्या उत्कर्षासाठी तयार केला जाणार आहे, असेही आयुक्त सिंह यावेळी म्हणाले.
भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाचे सचिव राजेश अगरवाल यांनी यावेळी केंद्र सरकारकडून दिव्यांगांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. तसेच दिव्यांगांचे प्रतिनिधी म्हणून मानव कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले तर उपस्थितांचे आभार अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी मानले.