पुणे : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या जरी आटोक्यात येत असली तरी कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे निर्बंधांमध्ये कोणत्याही प्रकारची सूट देण्यात येत नाही आहे. तसंच पुणे महापालिकेच्या हद्दीत सध्या लागू असलेले नियमच कायम राहणार असल्याचं नव्या आदेशात स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यात तेच निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.
येत्या आठवड्यातही पुण्यात तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू असणार आहेत. शनिवार, रविवार विकेंडला अत्यावश्यक सुविधा वगळता कडक निर्बंध लागूच राहणार आहेत. तसंच पर्यटन स्थळी बंदीच असेल. या निबंधानुसार व्यापारी, हॉटेल व्यावसायिक यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
आज पालकमंत्री अजित पवार हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी कोरोनाबाबत आढावा बैठक घेतील . मात्र पुणे पालिकेनं आधीच आदेश काढून निर्बंध कायम राहतील असे आदेश काढले आहेत. पुण्याच्या ग्रामीण भागात काही तालुक्यात 8 वी ते 12 वी चे वर्ग सुरू झाले असले तरी पुणे शहरात सर्व शैक्षणिक संस्था 31 जुलै पर्यंत बंदच राहतील असं आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
■ निर्बंध पुढीलप्रमाणे :
● पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.
● अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरु राहतील तर शनिवार रविवार पूर्णपणे बंद राहतील.
●मॉल्स, सिनेमागृहं संपूर्ण बंद.
● रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने आणि शनिवार रविवार फक्त पार्सल सेवा 11 पर्यंत चालू राहिल.
● अंत्यसंस्कार, दशक्रिया विधी व त्यासंबंधित कार्यक्रमांना 20 लोकांच्या उपस्थितीची परवानगी असेल.
● पुण्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद, धार्मिक स्थळांवर नित्योपचार पूजेला परवानगी
● कृषी संबंधित दुकाने आस्थापना आठवड्यातील सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत चालू राहतील.
● उद्याने मैदाने, जॉगिंग, रनिंग आठवड्यील सर्व दिवस पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत चालू राहतील.
● खासगी कार्यालय कामाच्या दिवशी पन्नास टक्के क्षमतेने दुपारी चार वाजेपर्यंत चालू राहतील.
● अत्यावश्यक सेवा संबंधी शासकीय कार्यालयं शंभर टक्के क्षमतेने चालू राहतील.
● लग्नसमारंभाला 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी, कोविडसंबंधी सर्व नियम पाळणं आवश्यक असणार.