पुणे, दि. १४ / आनंद कांबळे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज (१४ फेब्रुवारी) रोजी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (दूरदृष्य प्रणालीद्वारे), अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांचा हा पुतळा १५०० किलो ब्रांझचा आणी साडेतेरा फुटाचा आहे.
महाराष्ट्रच नाही तर पूर्ण देशातील गोरगरीब वर्गाच्या सुधारणेसाठी, शिक्षणासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आदी महात्म्यांनी केलेले कार्य त्यांचे जीवन चरित्र अभ्यासून हे कार्य आपण पुढे नेले पाहिजे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी यावेळी केले.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे पुन्हा एकदा आक्रमक, बसणार उपोषणाला
पुढे राज्यपाल कोश्यारी म्हणाले कि, सावित्रीबाई यांच्या जीवनाचा कालखंड हा इतिहास वाचण्यापेक्षा इतिहास घडवण्याचा, लिहिण्याचा कालखंड होता, सावित्रीबाई जर आज असत्या तर विद्यापीठे, शैक्षणिक क्षेत्रात मुली, महिलांचे अग्रस्थान पाहून त्यांना अतिशय आनंद वाटला असता असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, सर्वांना अभिमान वाटेल असा हा सोहळा आहे. सावित्रीबाई फुले यांचे नाव त्याच्याविषयीचे ऋण व्यक्त करण्यासाठी आपण दिले, मात्र त्या स्वत: एक विद्यापीठ होत्या. फुले दाम्पत्याने समाजबांधवांच्या आयुष्यात फुले फुलविण्याचा, त्यांच्या संसारात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विद्यापीठाने केवळ पुतळा उभारण्यापर्यंत मर्यादीत न रहाता सावित्रीबाईंच्या कार्याबाबात आदर वाटेल आणि त्यांच्या नावाला साजेसे असे अभ्यासक्रम राबवावेत, जेणेकरून विद्यापीठाचे नाव जगभरात आदराने घेतले जाईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
“व्हॅलेंटाईन्स डे” ला विरोध करत भर रस्त्यात फाशी, व्हिडिओ व्हायरल
महात्मा फुले अध्यासनासाठी राज्य शासन ३ कोटी देणार – उदय सामंत
सावित्रीबाई फुले यांचा पुतळा विद्यापीठ परिसरात उभारण्यासाठी शासनस्तरावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले. समाजहिताच्या कोणत्याही कामासाठी शासनाकडून पुढाकार घेण्यात येतो. राज्यस्तरावर विविध महापुरुषांचे विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यापीठात अध्यासने सुरू करण्यात आली आहेत. पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनासाठी ३ कोटी रुपये देण्यात येतील. विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचे जीवनचरित्र दर्शवणारी शिल्पे, लाईव्ह शो आदी बाबींच्या निर्मितीसाठी २ कोटी रुपये देण्यात येतील, असे उदय सामंत यांनी सांगितले.
या कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली. यावेळी मूर्तीकार संजय परदेशी यांचा सत्कार राज्यपाल महोदयांच्या हस्ते करण्यात आला. हरी नरके लिखीत ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.
पोलीस उपनिरिक्षक होण्याची सुवर्णसंधी एमपीएससी तर्फे 250 जागा
यावेळी विधान परिषदेच्या सभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (दूरदृष्य प्रणालीद्वारे) राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.