Friday, November 22, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPune : जातीव्यवस्था नाकारणारे, सावरकर राष्ट्रभक्तच होते - डॉ. श्रीपाल सबनीस

Pune : जातीव्यवस्था नाकारणारे, सावरकर राष्ट्रभक्तच होते – डॉ. श्रीपाल सबनीस

पुणे / क्रांतीकुमार कडुलकर : सावरकर कधीच प्रतिगामी नव्हते तर ते प्रखर राष्ट्राभिमानी, राष्ट्रनिष्ठावादी होते. समाज सुधारणेच्या बाबतीत त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांची राष्ट्रभक्ती नाकारणे हा देशद्रोह आहे. राष्ट्र सबळीकरणासाठी सावरकरांनी शक्तीपूजा, शस्त्रवापर करण्याला प्रोत्साहन दिले आणि अहिंसेला विरोध केला, असे प्रतिपादन विवेकवादी विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. सावरकर हे हिंदुत्व मानणारे असले तरी जातीव्यवस्था नाकारणारे होते, अशी टिप्पणीही त्यांनी केली. pune

मातंग साहित्य परिषद, पुणेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‌‘स्वातंत्र्यवीर सावरकर : समज गैरसमज‌’ या विषयावर आयोजित व्याख्यानात डॉ. सबनीस बोलत होते. भारतीय विचार साधना सभागृहात आयोजित कार्यक्रमात ॲड. विक्रम गायकवाड, डॉ. अंबादास सगट, संदीप तापकीर यांच्यासह मातंग साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे यांची उपस्थिती होती. Pune

साहित्यिक म्हणून सावरकरांनी निर्माण केलेल्या साहित्यकृती मनोरंजानात्मक नसून राष्ट्रभक्ती जागविणाऱ्याच आहेत, असे नमूद करून डॉ. सबनीस पुढे म्हणाले, महापुरुषांकडे विचारांचे सामर्थ्य असल्याने ते समाजात मोठे ठरतात. त्यांना जात-धर्म-देशाच्या चौकटीत अडकविता येत नाही. सावरकरांच्या राष्ट्रभक्तीचे महत्त्व जाणताना उदोउदो अथवा विरोध न करता मध्यम मार्गातून त्यांच्या भूमिकेकेडे पाहणे आवश्यक आहे. pune news

आजच्या काळात सावरकरांचे हिंदुत्व जानव्यात बंदिस्त करून बदनाम करण्याची भूमिका अत्यंत चुकीची आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समतावादी संवादी विचारांचा धागा उलगडताना महापुरुषांच्या संवादी सामर्थ्याची बेरीज होणे आवश्यक आहे.

सावरकरांची राष्ट्रभक्ती अस्सलच होती; परंतु त्यांचे हिंदुत्व हा मतभेदाचा मुद्दा ठरू शकते असेही ते म्हणाले. मातंग साहित्य परिषदेच्या माध्यमातून जातीच्या भिंती ओलांडून बहुजनांनी नाकारलेल्या सावरकर, टिळक, आगरकर यांच्या हिंदुत्व विचारांना जाणून घेत परिसंवादाचे आयोजन करणे ही स्वागतार्ह बाब आहे, असे त्यांनी आवजूर्न सांगितले.

डॉ. अंबादास सगट म्हणाले, सावरकर हे साहित्यिक, थोर कवी, चिंतनशील, धाडसी क्रांतिकारक, देशभक्त होते. ते अखेरच्या श्वासापर्यंत देशाच्या एकात्मतेसाठी झटले. सावरकरांनी नेहमीच कर्मकांडावर आघात केला आणि राष्ट्रनिष्ठा, देशप्रेम, देशभक्ती यांच्याद्वारे सामाजिक अभिसरण झाले पाहिजे. या भूमिकेवर ठाम राहिले. वर्णाश्रम, जातीव्यवस्था मोडून काढण्यासाठी सावरकरांनी सामाजिक क्रांती केली.

‌‘साहित्यिक सावरकर‌’ उलगडताना संदीप तापकीर म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर हे समाजात क्रांतिकारक म्हणून परिचित आहेत; परंतु साहित्यकार म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. व्याख्यानातून जी क्रांती घडत नाही ती साहित्यकृतीच्या वाचनातून घडते. या विचाराने सावरकरांनी साहित्य, नाट्यनिर्मिती केली. या निर्मितीचा हेतू मनोरंजन नसून समाजप्रबोधन हाच होता. साहित्यकार, नाटककार, कवी म्हणून सावरकरांचा परिचय होणे आवश्यक आहे.

ॲड. विक्रम गायकवाड म्हणाले, सावरकर समजून घेण्यासाठी त्यांचे आत्मचरित्र अभ्यासणे गरजेचे आहे. त्यांनी कायम अखंड भारताचे स्वप्न पाहिले. सावरकरांना माफीवीर म्हणले जाते, परंतु त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. सावरकर नामक झंझावाताची उपेक्षा करू नका, त्यांचे चरित्र वाचा, त्यांना जाणून घ्या असा सल्लाही त्यांनी दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. धनंजय भिसे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. सचिन पवार यांनी केले तर काशिनाथ देवधर, भास्कर नेटके, प्रकाश वैराळ, उषा नेटके, राजु ढावरे, दादाभाऊ आल्हाट, माणिक पौळ, राजू आवळे, अविनाश शिंदे, अमोल लोंढे, नाना कांबळे, घनश्याम वाघमारे, विजय रांजणे, रेश्मा परितेकर, संपत जाधव, भगवान वैरागर, श्रीनिवास राहळकर, डॉ. विनायक पवार, सुनिल मोरे, राजेश रासगे, सुधाकर पाटोळे, अमोल लोंढे, विनोद अष्टुळ, प्रा. विनोद सूर्यवंशी, रामेश्वर बावणे, उषा कांबळे, बाबासाहेब पाठोळे इत्यादी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते तर कार्यक्रमाचे आभार काशीनाथ आल्हाट यांनी मानले.

संबंधित लेख

लोकप्रिय