Friday, July 12, 2024
Homeजिल्हापुणे - लोणावळा चौपदीकरण रेल्वे मार्ग करण्यासाठी प्रसंगी उच्च न्यायालयात जनहित याचिका...

पुणे – लोणावळा चौपदीकरण रेल्वे मार्ग करण्यासाठी प्रसंगी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार – चिंचवड प्रवासी संघ

पिंपरी चिंचवड : मध्य रेल्वेचे व्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी तसेच, विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा चिंचवड रेल्वे स्थानक येथे पाहणी करण्यासाठी आले असताना चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने अध्यक्ष गुलामअली भालदार, पदाधिकारी सूरज आसदकर, मनोहर जेठवाणी, नंदू भोगले, मुकेश चुडासमा आदींनी निवेदन व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी मध्यरेल्वे विभागाच्या झेड.आर.यु.सी.सी. च्या सदस्या उमा खापरे यांनी देखील चिंचवड प्रवासी संघाच्या मागण्याची योग्य दखल घ्यावी, अशा सूचना महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांना केल्या.

चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार व पदाधिकार्‍यांनी स्वाक्षरी समवेत लेखी निवेदन दिले. त्यात १९८९ सालापासून प्रवासी यांना भेडसावणार्‍या अडचणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यरत आहे. चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने वेळोवेळी पत्रव्यवहार, वैयक्तिक भेटी घेवून निवेदने रेल्वे विभागाला दिल्या. उपयोग न झाल्यामुळे चिंचवड रेल्वे स्थानकावर उपोषण, आंदोलने, आत्मदहनासारखा मार्ग अवलंबिला लागला. त्यानंतरच आज पुणे-मुंबई सिंहगड, कोल्हापूर, मुंबई कोयना एक्सप्रेस, पुणे-इंदौर, पुणे-नाशिक, भूसावळ, नांदेड-पनवेल एक्सप्रेस गाड्यांना थांबा येता-जाता मिळू लागला आहे. आरक्षण केंद्र, पश्चिमेच्या बाजूला तिकीटघर नवीन पादचारी जिना, प्लॅटफॉर्मची रुंदी आदी विकास कामे प्रवासीयांसाठी उपलब्ध झाल्या आहेत.

पिंपरी चिंचवड शहर जगविख्यात औद्योगिक शहर असून या शहराची लोकसंख्या आज २७ लाखाहून अधिक आहे. या शहरात अंतरराष्ट्रीय उद्योग समूह आहे. ६५० मोठे उद्योग समूह आहे. व १० हजाराच्या आसपास मध्यम व लघू उद्योग, व्यवसायिक आहेत. या शहरात गुजरात, आंध्र प्रदेशातील परिसरातील २ लाख लोक वास्तव्य करतात. दक्षिण भारतातील केरळ, मद्रास परिसरातील ३ लाखाहून अधिक लोकसंख्या आहे. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार परिसरातील ५ लाखांच्या आसपास लोकसंख्या आहे. पश्चिम बंगाल, कलकत्ता परिसरातील दीड लाख लोकसंख्या आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, मिरज, सांगली, सातारा, अहमदनगर, जळगाव, धुळे, औरंगाबाद, नाशिक, मालेगाव, बीड, लातूर, कोकण, मुंबई, सोलापूर आदी भागातील ८ लाखांहून अधिक लोक नोकरी व्यवसायामुळे स्थायिक झाले आहेत. कमी कालावधीत उद्योग व्यवसाय वाढीमुळे दिवसेंदिवस या शहरात प्रचंड लोक नोकरी, व्यवसायाच्या शोधात पिंपरी चिंचवड शहरात येत आहे. दररोज १५० हून अधिक एक्सप्रेस गाड्या, मालवाहू गाड्यांची ये-जा असते. पुणे येथे किंवा कल्याण, दादर, पनवेल येथे जावून पुढील प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे वेळ, पैसा, शारिरीक त्रासाला सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यावर आज येत आहे.

पुणे-लोणावळा दरम्यान सुमारे ९० लाखांहून अधिक लोकसंख्या असून तळेगाव, चिंचवड, भोसरी, तळवडे, चाकण परिसरात उद्योग व्यवसाय, कर्मचारी वर्ग, मोलमजूरी करणारे, शिक्षण आदी कामांसाठी गोरगरीब मध्यमवर्गीय प्रवासीयांना पुणे-लोणावळा लोकलवर अवलंबून रहावे लागत आहे. पुणे-लोणावळा दरम्यान ४ युनिट लोकल गाड्या दिवसभरात ४२ फेर्‍या करतात. दररोज १ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. एक्सप्रेस गाड्या, मालवाहतूक, लोकल तिकीटांतून केंद्रीय रेल्वे खात्याला दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. नागरिकांना सुविधा मात्र आज मिळत नाही. कोरोना प्रादुर्भाव काळात प्लॅटफॉर्म तिकीटांपासून रेल्वेचे भाडेवाढ केल्यामुळे अनेक गरीब व मध्यमवर्गीय प्रवासीयांना त्यांच्या गावी ये-जा करते. आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही.

पुणे-लोणावळा दरम्यान लोकल वाढसाठी चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने १९८९ सालापासून प्रयत्न करीत आहे. रेल्वे अधिकार्‍यांना भेटले असता निधी उपलब्ध नाही, मुंबईतच लोकल कमी पडतात, लोकल रेक (युनिट लोकल) उपलब्ध झाल्या तर, पुणे-लोणावळा दरम्यान नवीन लोकलवाढ करू असते सांगितले. गेल्या ३५ वर्षात रेल्वे मंत्री, मध्यरेल्वे महाव्यवस्थापक, रेल्वे बोर्ड यांच्या बरोबर सातत्याने चिंचवड प्रवासी संघ पत्रव्यवहार करीत असताना रेल्वे विभागाकडून अनेकवेळा लेखील पत्र व आश्वासनच मिळाले. अशातच जानेवारी २०२० साली मध्य रेल्वे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका, राज्य शासनाने पुणे-लोणावळा दरम्यान ६३ किलोमीटर रेल्वे मागावर तिसर्‍या व चौथ्या रेल्वे लाईनसाठी एकूण ४३०० कोटी रूपयांच्या खर्चापैकी पुणे महानगरपालिकेने ३७५ कोटी व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने २५० कोटी रूपयांचा खर्च उचलणे बंधनकारकच आहे. तो त्यांनी न दिल्यास संपूर्ण प्रकल्प गुंडाळला जावू शकतो पर्यायाने एकही नवीन लोकल पुणे-लोणावळा दरम्यान सुरू होऊ शकणार नाही., असे वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले आहे.

सन २०२० सालापासून आजपर्यंत चिंचवड प्रवासी संघाने माहिती घेतली असता पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील नगरसेवकांची मानसिकता रेल्वे विभागाला आवश्यक निधी ५ ते १० टक्के एकूण खर्चाच्यापैकी देण्याची दिसून आली नाही. याचा चिंचवड प्रवास संघ निषेध करीत असून दोन्ही महापालिका व राज्य शासनाने पुढाकार घेतला असता, तर, पुणे लोणावळा दरम्यान रखडलेले चौपदरीकरण रेल्वे मार्गाचे काम आज मार्गी लागले असते. पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील खासदार, आमदारांनी देखील हव्या त्या प्रमाणात पाठपुरावा केल्याचे दिसून आले नाही. रेल्वे विभाग देखील दोन्ही महानगरपालिकेचे ६२५ कोटी रूपये तसेच, राज्य शासनाचा निधी न मिळाल्यामुळे पुणे-लोणावळा चौपदरीकरणाचा प्रश्न सुटू न शकल्यामुळे आज पुणे-लोणावळा दरम्यान प्रवास करणार्‍या एक लाखांहून अधिक प्रवासीयांची ससेहोलपट होत असून त्यांचा वेळ, पैसा, शारिरीक त्रासाला सामोरे जाण्याची वेळ आली आहे.

पुणे-लोणावळा दरम्यान ११ मार्च १९७८ साली पुणे-लोणावळा दरम्यान पहिली लोकल धावली. त्यानंतर १९८२ सालापर्यंत तीन युनिट लोकल धावू लागल्या आज ४ युनिट लोकल धावत आहे. प्रथम अकरा, नंतर बारा डब्याच्या आज लोकल वेळोवेळी मागणी केल्यानंतरच प्रवासी सेवेसाठी धावत आहे. गर्दीमुळे आज दरवर्षी २५० हून अधिक प्रवासी मृत्यूमुखी पडत आहेत. अनेक जखमी होत आहे. याचा विचार रेल्वे विभाग दोन्ही महापालिका, राज्य शासन व केंद्र सरकार करीत नाही. याचा निषेध प्रवासी व प्रवासी संघटना वारंवार करीत आहे. सन २०१९ साली चिंचवड येथे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी.के. शर्मा यांचा चिंचवड रेल्वे स्थानकावर पाहणी दौरा होता. त्यावेळी देखील  त्यांना चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने लेखी निवेदन दिले. परंतु, अनेक मागण्याकडे रेल्वे विभागाने दुर्लक्ष केले आहे. आता चिंचवड प्रवासी संघ पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रवासीयांच्या हितासाठी त्यांच्या प्रश्नासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे. स्थानिक खासदार, आमदारांनाही पत्रव्यवहार करून त्याच्या पाठींब्याचे पत्रे, महाविद्यालयाचे, उद्योगसमूह आदीचे पत्र घेवून जनहित याचिका दाखल करणार आहे.

आकुर्डी-देहूरोड दरम्यान पाच किलोमीटरचे अंतर असून रावेत परिसरात आज दीड लाखांहून अधिकची लोकसंख्या झाली आहे. नवीन रावेत रेल्वे स्थानक निर्माण करण्यात यावे. चिंचवड येथे मुंबई, पुणे, सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस गाडी, दादर ते चेन्नई एक्सप्रेस, कन्याकुमारी ते मुंबई एक्सप्रेस, श्री छत्रपती शाहू महाराज (कोल्हापूर टर्मिनल) ते अहमदाबाद एक्सप्रेस, मुंबई, हैद्राबाद एक्सप्रेस, रेणुगुंठा येथे बालाजी मंदिर आहे. पिंपरी चिंचवड शहरातील भाविकांसाठी लोकमान्य टिळक ते चेन्नई एक्सप्रेस गाडी अजमेरला जाणारी एक्सप्रेस गाडीला चिंचवड येथे ये-जा थांबा मिळावा, यासाठी पाठपुरावा गेली २० वर्षे करीत आहे. या एक्सप्रेस गाडीसाठी पुणे येथे ये-जा करण्यासाठी रिक्षाने ४०० ते ५०० रुपये खर्च येतो, वेळ जातो या एक्सप्रेस गाड्या चिंचवड येथे थांबणे गरजेचे आहे. पिंपरी चिंचवड शहरात कोकण, चिपळून, गोवा, मेंगलोर, मडगाव भागातील प्रवासीयांसाठी पुणे एर्नाकुलम एक्सप्रेस थांबा मिळाला पाहिजे. भाविकांसाठी पुणे ते हरिद्वार नवीन एक्सप्रेस गाडी सुरू करण्यात यावी.

चिंचवड येथे एक्सलेटर (सरकता जिना) चे लेखी पत्र मध्यरेल्वेचे सहाय्यक सचिव सु.मु. केळकर यांनी २०१८ साली दिले. नवीन पादचारी जिना तयार होत आहे. परंतु एक्सलेटर (सरकता जिना) तयार होणे, महत्त्वाचे आहे. तसे पत्र सल्लागार अ‍ॅड. मनोहर सावंत यांना देखील मध्य रेल्वेने दिले आहे. चिंचवड येथे आज अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला आदींना प्रवासीयांना सामानासहीत चढ-उतार करणे शक्य होत नाही, त्यासाठी चिंचवड येथे एक्सलेटर (सरकता जिना) झाला पाहिजे. कोच मार्गदर्शक प्रणाली (इलेक्ट्रॉनिक) पुणे-लोणावळा (अप) मार्गावर आज सुरू केली आहे. तशीच आकुर्डी-पुणे मार्गावर (डाऊन) येथे होणे गरजेचे आहे. अनेक आरक्षित तिकिटे असलेल्या प्रवासीयांना त्यांचा आरक्षित डबा न मिळाल्याने गाडी चुकलेली आहे. चिंचवड येथे दोन्ही बाजूला प्रवासीयांच्या सोयीसाठी रिक्षा थांबा पुणे रेल्वे स्थानकाप्रमाणे रेल्वेच्या हद्दीतच होणे गरजेचे आहे. चिंचवड येथे पुर्वेच्या दिशेला गेल्या २७ वर्षापासून नोंदणीकृत रिक्षा थांबा आहे. रेल्वे पोलीसांनी रिक्षा थांब्याचे फलक काढून टाकले आहे. महाविद्यालयीन मुलांच्यासाठी सवलतीचे पास घेण्यासाठी रेल्वे पास आरक्षण पुस्तिका आज पुणे येथे मिळतात ते चिंचवड येथे उपलब्ध झाले पाहिजे. अनेक महाविद्यालयांना पुणे येथे जावून रेल्वे पास आरक्षण पुस्तिका आणण्याची वेळ येत आहे. सिंहगड एक्सप्रेसला पिंपरी व चिंचवडसाठी स्वतंत्र बोगी असली पाहिजे.

पिंपरी चिंचवड शहरातील एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के रेल्वे प्रवासीयांवर अवलंबून आहेत. त्याचा विचार केला पाहिजे, ही विनंती प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, पदाधिकारी सूरज आसदकर, मनोहर जेठवाणी, नारायण भोसले, मुकेश चुडासमा, हार्दिक जानी, नयन तन्ना, नंदू भोगले, दिलीप कल्याणकर, निर्मला माने, दादासाहेब माने, सल्लागार अ‍ॅड. मनोहर सावंत, डॉ. राजेंद्र कांकरीया, डॉ. पोर्णिमा कदम यांनी केली आहे.

यावेळी चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी कृषीमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींना ई-मेलद्वारे निवेदनाची प्रत दिली असून लवकरात लवकर पुणे लोणावळा चौपदरीकरणाचा प्रश्न व आदी मागण्यांबाबत योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली आहे.


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय