पुणे : महाराष्ट्रातील शेतकरी, कामगार व जनसामान्य यांच्या हिताचे रक्षण करणारे धीरोदात्त व्यक्तिमत्व. स्वातंत्र्य आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, भूमी मुक्ती आंदोलन, एनरॉन विरोधी आंदोलन, सेझ विरोधी आंदोलन अशी सुमारे 70 वर्षाची संघर्षाची वाटचाल करणारे नेतृत्व आज शांत झाले.
महाराष्ट्राच्या पुरोगामी, डाव्या चळवळीतील एन. डी. पाटील हे अग्रगण्य नेतृत्व – कामगार नेते अजित अभ्यंकर
एन. डी. पाटील हे प्रगल्भ पुरोगामी विचारांचे नेते होते. महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीत त्यांनी मोठे योगदान दिले. सर्वप्रथम 1978 मध्ये पुलोद सरकारचे सहकार मंत्री प्रा. एन. डी. पाटील यांनी योजनेत क्रांतिकारक बदल घडवून आणले. पुलोद सरकारची सुधारित कापूस खरेदी योजना जाहीर करून महत्त्वपूर्ण धोरणात्मक बदल केले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कापसाचा हमीभाव दिल्ली सरकारच्या कृषी मूल्य व उत्पादन खर्च आयोगाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा 20 टक्के जास्त मिळवून दिला. एसईझेड, एन्रॉन प्रकल्पाविरोधातील आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व करून सरकारवर दबाव वाढवला होता. महाराष्ट्राच्या पुरोगामी, डाव्या चळवळीतील एन डी पाटील हे अग्रगण्य नेतृत्व होते.
हेही वाचा ! प्रा. एन. डी. पाटील यांची राजकीय व सामाजिक कारकीर्द
कायम मूल्यांची विचाराची कास धरणारे नेतृत्व – सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन
प्रा. एन. डी. पाटील यांची संघर्षशील व कृतार्थ जीवनयात्रा अखेर थांबली. अतिशय कणखर अभ्यासू आणि लढाऊ नेतृत्व हरपले. कायम मूल्यांची विचाराची कास धरून चालणारे असे दुर्मिळ राजकीय नेते ही त्यांची ओळख होती. आयुष्य भर राजकारण वा सत्ताकारण असो की रस्त्यावरील जनआंदोलन , त्यांनी कष्टकरी वर्गाच्या हिताला प्राधान्य दिले. कधीच आपली भूमिका पातळ होऊ दिली नाही.
अन्याय अत्याचार विरोधी कठोर भूमिका, स्पष्ट मांडणी व प्रश्न हाताळण्याचे कसब हे त्यांचे वैशिष्ट्य होते. खडा आवाज; दांडगी स्मरणशक्ती, इतिहासाची नेमकी समज, भाषेवर प्रभुत्व, तोंडपाठ किस्से, म्हणी, कविता यामुळे त्यांची भाषणे ऐकणे ही एक पर्वणीच होती. शेतकरी, कामगार, आदिवासी, दलित, भटके विमुक्त व महिला यांच्या प्रश्नावर ते सातत्याने लढत राहिले. लढा अन्याय्य व्यवस्थेविरोधी असला पाहिजे याचे भान त्यानी सतत राखले. महाराष्ट्र भरातल्या लढाऊ व प्रामाणिक कार्यकर्त्यांचा पाठी ते नेहमी उभे राहिले.
नोकरीची संधी : नवोदय विद्यालयात १९२५ जागांसाठी भरती, १८ हजार ते २ लाख रूपये पगाराची संधी !
अभ्यास, लिखाण, कणखर भूमिका व दमदार मांडणी यामुळे ते महाराष्ट्रात लोकप्रिय नेते राहिले. आमच्या सारख्या अनेक कार्यकर्त्याना ते पितृतुल्य होते. त्यांच्या प्रेमळ व आश्वासक आधाराला आम्ही मुकलो आहोत. मूल्याधिष्ठित राजकारण व परिवर्तनाची चळवळ दोन्ही क्षेत्रात आज त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
एन. डी. पाटील : जनसंघर्षाचा नेता गेला – स्वराज अभियान मानव कांबळे
महाराष्ट्रातील शेतकरी, कामगार व जनसामान्य यांच्या हिताचे रक्षण करणारे, धीरोदात्त व्यक्तिमत्व स्वातंत्र्य आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, भूमी मुक्ती आंदोलन, एनरॉन विरोधी आंदोलन, सेझ विरोधी आंदोलन अशी सुमारे 70 वर्षाची संघर्षाची वाटचाल करणारे नेतृत्व आज शांत झाले. राज्यात कष्ट करणाऱ्या जनतेच्या प्रत्येक लढ्यात एन.डी अग्रेसर होते. त्यांच्या संघर्षातूनच रोजगार हमी योजना, कापूस एकाधिकार योजना, समान पाणी वाटपाचा आग्रह या समाज हितैषी योजना उभ्या राहिल्या.
हेही वाचा ! ज्योती बसू : पक्ष निर्णयानुसार पंतप्रधान पद नाकारणारे, पश्चिम बंगालचे सलग २३ वर्षे मुख्यमंत्री राहिलेले नेते
सीमाभागातील मराठीभाषक बांधवांचे आधारवड – जातीअंत संघर्ष समितीचे डॉ.किशोर खिल्लारे
शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, कष्टकरी, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांसाठी लढणारं संघर्षशील नेतृत्वं काळाच्या पडद्याआड गेले आहे. एन. डी. पाटील सीमाभागातील मराठीभाषक बांधवांचे आधारवड होते. प्रा. एन. डी. पाटील सर निर्भिड, नि:स्पृह, निडर नेते होते. महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ बाबासाहेब आंबेडकर व महर्षी शिंदे यांच्या विचारांशी बांधिलकी ठेवून गोरगरीब कष्टकऱ्यांच्या रस्त्यावरील लढाईत ते अग्रभागी होते. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन आणि त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन दलित श्रमिकांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणे हीच त्यांना भावपूर्ण आदरांजली.
– क्रांतिकुमार कडुलकर
१० वी – १२ वी झालेल्यांना संधी ! भारतीय सीमा सुरक्षा दलात २७८८ जागांसाठी भरती