जुन्नर : तालुक्यातील पश्चिम भागात अवैध दारुचे धंदे जोरात चालले आहे. परंतु पोलिस प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. तर अनेक गावात पोलिसांचाच वरदहस्त असल्याची चर्चा आहे.
कोरोनाची महामारी असली तरी पश्चिम आदिवासी भागात दारुची महामारी असून धंदे तेजीत चालले आहेत. तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील अनेक गावात दारुचे धंदे चालू असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. पश्चिम आदिवासी भागातील घाटघर, तळेचीवाडी, खडकुंबे, निमगिरी, पेठेचीवाडी, तळेरान, चावंड या गावांमध्ये दारु गुत्ते सुरू आहेत.
घाटघर ग्रामपंचायतीने अवैध दारु धंद्याबाबत ग्रामपंचायतीचे एकमताने ठराव एक वर्षापूर्वी केला होता. परंतु तरीही कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याचे ग्रामस्थ म्हणाले. घाटघर, तळेचीवाडी मध्ये काही महिन्यांपूर्वी महिला आक्रमक झाल्या होत्या, परंतु कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने नाराजी आहे.
अवैध दारु धंद्यामुळे कौटुंबिक कलह वाढले आहेत. वाढत्या नैराश्यामुळे तरुणांमध्ये व्यसनाचे प्रमाणात वाढले आहे. त्यात ग्रामीण भागातील अवैध दारुधंद्यामुळे तरुणाई व्यसनाच्या अधीन झाली आहे. पोलीस प्रशासनाने तरुणांचे भवितव्य आणि समाजाचे स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी त्वरित कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.