मुंबई :- पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ असणाऱ्या एका रासायनिक कंपनीला आग लागल्याची घटना घडली, या आगीत १८ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यामध्ये १५ महिला कामगारांचा समावेश आहे. राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.
आग लागण्याची ही दुर्दैवी आणि क्लेशदायक घटना असून अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी, बचावासाठी शर्थीचे प्रयत्न करुनही काहींना वाचवता आलं नाही, हे अधिक दु:खदायक असल्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच, दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांबद्दल सहानुभूती असून मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देणार असल्याचे,” अजित पवार यांनी सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी प्राथमिक गुन्हा नोंदवून घेतला असून मावळ प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञांच्या समितीकडून आगीच्या कारणांची चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.