Thursday, March 28, 2024
Homeजिल्हादुरुस्तीसाठी पुणे विमानतळ बंद, प्रवाशांना मनस्ताप

दुरुस्तीसाठी पुणे विमानतळ बंद, प्रवाशांना मनस्ताप

पुणे : लोहगाव विमानतळावरील प्रवासी उड्डाणे 14 दिवस बंद राहणार आहेत. विमानतळावरील धावपट्टी दुरुस्ती कामासाठी 16 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबरपर्यंत लोहगाव विमानतळावरील प्रवासी उड्डाणे बंद ठेवण्याचा निर्णय विमानतळ प्रशासनाने घेतला आहे. 16 ऑक्टोबर पासून प्रवाशांना आता मुंबई विमानतळावर अवलंबून राहावं लागणार आहे. आधीपासून बुकिंग असलेल्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे. 

लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीच्या दुरुस्तीचे काम सप्टेंबर 2020 पासून हाती घेण्यात आलं आहे. 26 ऑक्टोबरपासून या कामाचा महत्वाचा टप्पा सुरु झाला होता. तेव्हापासून लोहगाव विमानतळावरुन रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत होणारी प्रवासी उड्डाणं बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे मागील वर्षभर या विमानतळावरुन फक्त दिवसाच उड्डाणं होत होती. मात्र आता 16 ऑक्टोबरपासून 16 दिवस तिही बंद होणार आहे. 16 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबर दरम्यान लोहगाव विमानतळावरुन प्रवासी उड्डाणे बंद करण्यात येणार असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली आहेत.

पुण्यात विमान प्रवासी वाहतुकीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सध्या असलेल्या इमारतीत प्रवाशांची मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी पुणे विमानतळ प्राधिकरणाने 5 लाख चौरस फुटापेक्षा जास्त क्षेत्रफळ आणि अत्याधुनिक सोयीसुविधा असलेलं इंटिग्रेटेड टर्मिनल बांधण्यात येणार आहे. या टर्मिनलमध्ये दरवर्षी 1 कोटी 90 लाख प्रवाशांना सामावून घेण्याची क्षमता असणार आहे. नव्या टर्मिनलचं 61 टक्के काम पूर्ण झालं असून 2022 पर्यंत ते वापरासाठी खुलं होईल, अशी माहिती दिली आहे. 

पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत 30 ऑगस्ट रोजी विमानतळ प्राधिकरणाची बैठक पार पडली होती. त्यावेळी त्यांनी विमानतळ विस्तारीकरणाबाबत आढावा घेतला होता.


संबंधित लेख

 


लोकप्रिय