पुणे : उपचाराची गरज असलेल्यांचा आकडा रोज चारशेच्या पुढे जात असल्याने जम्बो कोविड केअर सेंटरचा आता पुन्हा विस्तार होणार असून, या ठिकाणी रुग्णांसाठी आठशे बेड उपलब्ध होणार आहेत. त्यात सहाशे ऑक्सिजन आणि दोनशे अतिदक्षता विभागातील (आयसीयू) बेडचा समावेश असेल. परिणामी, गरजूंना सहजरित्या उपचार मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) आवारातील ‘जम्बो’त सध्या चारशे बेडची सुविधा असून, त्यातील सव्वातीनशे ऑक्सिजन आणि 75 आयसीयू बेड आहेत.
मात्र, सध्या रोज सरासरी चार हजार जणांना कोरोनाची लागण होत असल्याचे आकडे आहेत. त्यातील किमान दहा ते बारा टक्के लोकांना उपचारासाठी रुग्णालयांत दाखल करावे लागत आहे. मात्र, सध्या रोज सरासरी चार हजार जणांना कोरोनाची लागण होत असल्याचे आकडे आहेत. त्यातील किमान दहा ते बारा टक्के लोकांना उपचारासाठी रुग्णालयांत दाखल करावे लागत आहे.
रुग्णांच्या सोयीसाठी जम्बोतील बेडची संख्या दुपटीने वाढवितानाच रुग्णांना मागणीनुसार बेड देण्याची सोय केली जाणार आहे. सध्या बेडच्या नोंदणीसाठी ‘हेल्पलाइन’च्या माध्यमातून संपर्क साधल्यास फोन उचलले जात नसल्याचे अनुभव आहेत. त्यामुळे एक-दोनदा संपर्क केल्यानंतर लोकांना बेड देण्याचा प्रयत्न असेल, असे जम्बोचे समन्वय राजेंद्र मुठे यांनी सांगितले.
रुग्णवाढीचा वेग, सर्व रुग्णालयांतील उपचार व्यवस्था, रुग्णांची मागणी लक्षात घेऊन जम्बो आणि अन्य ठिकाणी बेड वाढविण्यात येणार आहेत. ज्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना कमीत-कमी वेळेत उपचार मिळतील. याचवेळी खासगी रुग्णालयांतील उपचार व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी करून बेड ताब्यात घेत आहोत.
-रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका
रुग्णांना ऑक्सिजन आणि अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार देण्याचे प्रमाण अधिक आहे. अशा रुग्णांची संख्या वाढल्याने पहिल्यांदा ऑक्सिजन बेड वाढविण्यात येतील. त्याबाबत पालकमंत्री अजित पवार आणि महापालिकेतील अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे.
-अंबर आयबे, ‘सीईओ’, जम्बो कोविड केअर सेंटर
जम्बोची मूळ क्षमता
* बेड – 800
* ऑक्सिजन बेड – 600
* आयसीयू – 200
सध्याची स्थिती
* एकूण बेड – 400
* ऑक्सिजन बेड – 325
* आयसीयू – 75