अंधश्रद्धा निर्मूलन विशेषांकाचे आकुर्डीत प्रकाशन करताना मान्यवर. |
पिंपरी चिंचवड : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका विशेषांकाचे स्थानिय प्रकाशन आकुर्डी येथील श्रमशक्ती भवन येथे घेण्यात आले. या प्रकाशन समारंभाचे आयोजन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आकुर्डी शाखेने केले होते.
कार्यक्रमासाठी महाराष्ट्र अंनिसच्या पुणे जिल्हा अध्यक्ष मानव कांबळे, माजी नगरसेविका भारती फरांदे, नगरसेवक गजानन चिंचवडे, काँग्रेस कमिटी सदस्य कामगार नेते कैलास कदम, माजी नगरसेवक गजभिये, गिरीश वाघमारे, अंनिस राज्य पदाधिकारी ॲड. मनिषा महाजन, जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर कटारिया, अनिल रोहम, महाराष्ट्र अंनिसच्या आकुर्डी शाखेचे अध्यक्ष डॉ. योगेश गाडेकर, महाराष्ट्र अंनिसच्या आकुर्डी शाखा कार्याध्यक्ष क्रांती दांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या वार्षिक अंकाचे प्रकाशन झाले.
अंधश्रद्धा निर्मूलन विशेषांकांच्या प्रकाशनाच्या वेळी उपस्थित मान्यवर |
“पिंपरी चिंचवड सारख्या औद्योगिक दृष्ट्या पुढारलेल्या शहरात सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलनाची गरज आहे. तसेच हे काम शहराबरोबरच खेडोपाडी करण्याची गरज आहे” असे मत मानव कांबळे यांनी व्यक्त केले.
कैलास कदम यांनी सदरच्या कामांमध्ये आम्ही प्रत्यक्ष सहभागी नसलो तरी नेहमी साथ देण्याची ग्वाही दिली. पत्रिकेचा अंक हा लोकांच्या जनजागृतीसाठी आणि सामाजिक परिवर्तनासाठी खूप आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले. फरांदे यांनी आपल्याला समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून परिवर्तन घडवता येईल असे मत मांडले.
सदर कार्यक्रम हा कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून फिजिकल डिस्टन्स पाळून घेण्यात आला. हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते. तसेच सदर कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांनी सहभाग नोंदवून असे कार्यक्रम नियमित घडावेत अशी आशा व्यक्त केली. कार्यक्रमाचे नियोजन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आकुर्डी शाखेचे कार्याध्यक्षा क्रांती दांडेकर, गंगाधर सत्वधर, एकनाथ पाठक, नेहा सोनवणे, ॲड. रमेश महाजन आदी कार्यकर्त्यांनी केले.