|
Photo : Twitter |
ओटावा : कॅनडात सक्तीचे लसीकरण आणि कोरोना निर्बंधांच्या विरोधात असंतोष उफाळला असून, त्याविरोधात आंदोलन पेटले आहे. 50 हजार ट्रक चालकांच्या नेतृत्वात राजधानी ओटावा येथे रस्ते रोखण्यात आले आहे, येथे 3 आठवड्यापासून निदर्शने सुरू असुन तेथील परिस्थिती अजूनही तशीच आहे. आता कॅनडाचे सरकार हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे.
तीन आठवड्यापासून सुरू असलेले हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी कॅनडा सरकारनेही कंबर कसली आहे. यासाठी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली. यानंतर घोषणेच्या तिसऱ्या दिवशी, ट्रक ड्रायव्हर्सच्या स्वातंत्र्य काफिला हटविण्यासाठी चिलखती वाहने आणि माउंट केलेले सैनिक पुन्हा सोडण्यात आले. त्यांनी 100 हून अधिक लोकांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आंदोलकांमध्ये चार नेत्यांचा समावेश आहे. त्यापैकी एका नेत्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला असून, उर्वरित तीन नेते तुरुंगात आहेत.
कॅनडा सरकारच्या या कठोर भूमिकेनंतरही आंदोलक माघार घ्यायला तयार नाहीत. आंदोलकांनी हलण्यास नकार दिल्यावर दंगलविरोधी पोलिसांनी मिरपूड स्प्रे आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच, आंदोलकांना घोड्याच्या पायाखाली चिरडण्याचा प्रयत्न झाल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, येथील सततच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर, क्युबेकमधील तीन महाविद्यालये बंद झाली आहेत. त्यानंतर तेथे शिकणाऱ्या सुमारे २ हजार भारतीय विद्यार्थ्यांसमोर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.