Monday, July 15, 2024
Homeराज्यसामाजिक राजकीय क्षेत्रातून आदरांजली : शेतकरी व कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज हरपला,...

सामाजिक राजकीय क्षेत्रातून आदरांजली : शेतकरी व कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज हरपला, “एन. डी.” पुरोगामी चळवळीचं चालतं बोलतं विद्यापीठ

कोल्हापूर : शेतकरी व कष्टकरी जनतेच्या बुलंद आवाज ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी .पाटील यांचे निधन झाले. ते ९३ वर्षाचे होते. एन. डी .पाटील यांनी सातत्याने सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरून आंदोलने केली होती. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

जनतेचा बुलंद आवाज हरपला – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे 

“शेतकरी व कष्टकरी जनतेचा बुलंद आवाज हरपला आहे. महाराष्ट्राने एक संघर्षशील नेतृत्व गमावले आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली.

हेही वाचा प्रा. एन. डी. पाटील यांची सामाजिक राजकीय कारकीर्द

मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की, “एन. डी. पाटील हे राज्याच्या पुरोगामी विचारांचे व्यासपीठ होते. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांची मशाल त्यांनी शेवटपर्यंत पेटत ठेवली. लढणे आणि संघर्ष करणे हेच त्यांचे जीवन होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातले ते एक बिनीचे शिलेदार होतेच, पण त्यानंतरच्या बेळगावसह सीमा लढ्यातील प्रत्येक आंदोलनात एन. डी. आघाडीवर होते. सीमा भागात जाऊन त्यांनी लढे दिले व पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या. 

प्रा. एन. डी. पाटील : पोटतिडीकीने काम करणारे झुंजार नेते – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 

प्रा. एन. डी. पाटील हे जनसामान्य, कष्टकरी, शेतकरी व कामगारांसाठी अतिशय पोटतिडीकीने काम करणारे झुंजार नेते होते. कोणताही प्रश्न ते अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडत व त्याचा सातत्यपूर्ण पाठपुरावा करत. शिक्षण क्षेत्राकरिता त्यांचे कार्य मोठे होते. अनेक आंदोलने व विधायक चळवळींना त्यांनी नेतृत्व प्रदान केले.  राज्य विधान मंडळाचे सदस्य म्हणून दीर्घ काळ काम करणारे प्रा. पाटील आदर्श लोकप्रतिनिधी होते.  त्यांच्या निधनामुळे शिक्षण, समाजकारण व राजकारण यांसह विविध क्षेत्रांमध्ये वावर असलेल्या एका प्रामाणिक लोकनेत्याला आपण मुकलो आहोत. अशा शब्दांत निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

हेही वाचा ! ज्योती बसू : पक्ष निर्णयानुसार पंतप्रधान पद नाकारणारे, पश्चिम बंगालचे सलग २३ वर्षे मुख्यमंत्री राहिलेले नेते

पक्षाशी आणि डाव्या चळवळीशी अखेरपर्यंत एकनिष्ठ, ती चळवळ जोमाने पुढे नेऊ – शेतकरी नेते डॉ. अशोक ढवळे 

भाई एन. डी. पाटील हे महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेचे एक तेजस्वी दीपस्तंभ होते. स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सीमा चळवळ, शेतकरी चळवळ आणि शिक्षण प्रसाराची चळवळ या सर्वांत त्यांचे अतिशय मोलाचे योगदान होते. 

१९४८ साली शेतकरी कामगार पक्षात त्यांनी प्रवेश केला आणि अखेरपर्यंत ते त्या पक्षाशी व डाव्या चळवळीशी एकनिष्ठ राहिले. अनेक वर्षे त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीसपद भूषविले. महाराष्ट्राच्या समग्र डाव्या व पुरोगामी चळवळीचे ते सर्वमान्य नेते होते. मार्क्स, फुले, सावित्रीबाई, शाहू, आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुरोगामी वारसा त्यांनी प्रचंड ताकदीने पुढे नेला.

हेही वाचा ! ओडिशात आदिवासींवर कंपनी – सरकार चे जुलमी राज्य – डॉ. संजय दाभाडे

१९७२-७३च्या भीषण दुष्काळाविरुद्धचे आंदोलन, त्यात इस्लामपूर आणि वैरागच्या गोळीबारात झालेले शेतकरी हुतात्मे, आणीबाणीविरोधी लढा, एन्रॉन विरुद्धचे आंदोलन, महामुंबई एसईझेड विरुद्धचा लढा, कोल्हापूरचे टोल विरोधी आंदोलन, आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या धर्मांध शक्तींनी केलेल्या हत्येच्या सखोल व जलद तपासासाठीची मोहीम, या व इतर अनेक जनआंदोलनांत भाई एन. डी. पाटील यांचा सिंहाचा वाटा राहिला. 

जनताभिमुख लोकनेता हरपला – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष राज्य सचिव नरस्या आडम 

भाई एन. डी. पाटील हे १९५९ साली वयाच्या २९ व्या वर्षी प्रथम महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. ते विधान परिषदेवर तीनदा आणि विधान सभेवर एकदा निवडून आले. १९७८ ते १९८० या पुलोद सरकारच्या काळात ते महाराष्ट्राचे सहकार मंत्री होते. त्या काळात कापूस एकाधिकार खरेदी योजना आणि रोजगार हमी योजना उत्कृष्टपणे राबविण्यात भाई एन. डी. पाटील आणि भाई गणपतराव देशमुख या शेकापच्या मंत्रीद्वयांचे फार मोठे योगदान होते.

नोकरीची संधीनवोदय विद्यालयात १९२५ जागांसाठी भरती, १८ हजार ते २ लाख रूपये पगाराची संधी ! 

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेचे भाई एन. डी. पाटील अनेक वर्षे चेअरमन होते. गोरगरीब समाजातील बहुजन, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि मुलींमध्ये शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी अनेक धडक योजना राबविल्या. 

भाई एन. डी. पाटील यांनी राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शेती, शिक्षण अशा अनेक विषयांवर प्रगल्भ लेखन केले. महाराष्ट्रातील अनेक पुरोगामी संस्थांचे ते अध्यक्ष अथवा पदाधिकारी होते. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.

हेही वाचा ! ‘जीवन संघर्ष’ कविता संग्रहातील कवितेत मानवा विषयी निर्भय आणि निर्भीड आवाज

महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात नैतिक धाक व अंकुश राहिलेले व्यक्तिमत्त्व – समाज प्रबोधनी सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी 

एन.डी.सर गेले एका युगाचा अंत झाला. महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात नैतिक धाक व अंकुश म्हणून ज्यांचा आदरपूर्वक उल्लेख करावा लागेल असे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रा.डॉ.एन.डी. पाटील.अथक परिश्रम करणाऱ्या सरांच्या शब्दकोशात थकणे हा शब्दच नव्हता.अविश्रांत वाटचाल आणि  एन.डी. हे समानार्थी शब्द आहेत.त्यांच्या जाण्याने समाजवादी प्रबोधिनीच्या संस्थापकांपैकी अखेरचा व सर्वात बुलंद आवाज प्रबोधिनीने गमावला आहे. त्यांचे विचारकार्य अधिक जोमाने करीत राहणे हीच त्यांना आदरांजली ठरेल.

पर्यायी शेतकी धोरणांचा सातत्याने आग्रह धरणारे व्यक्तिमत्त्व – किसान नेते डॉ. अजित नवले

भाई एन. डी. पाटील यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीचे आणि शेतकरी चळवळीचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. भाई एन. डी. पाटील हे शेतकरी-शेतमजूर आणि श्रमिक वर्गासाठी सातत्याने संघर्ष करणारे नेते होते. आपलं संपूर्ण जीवन त्यांनी श्रमिक वर्गांच्या हक्कासाठी संघर्ष करण्यात आणि मानवमुक्तीसाठी पर्यायी धोरणांची मांडणी करण्यात कामी लावले. महाराष्ट्रात झालेल्या अनेक दैदिप्यमान संघर्षांमध्ये भाई एन. डी. पाटील नेतृत्वस्थानी होते. शेतकऱ्यांना व शेतमजुरांना शेतीच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी व देशव्यापी शेतकी संकट मुळातून नष्ट करण्यासाठी भाई एन. डी. पाटील पर्यायी शेतकी धोरणांचा सातत्याने आग्रह धरत असत. त्यांचे अपूर्ण कार्य पुढे नेण्याचा काम करू.

राज्यातील शेतकरी कामगार वर्ग पोरका झाला – कामगार नेते डॉ. डी. एल. कराड 

प्रा. एन डी पाटील यांच्या निधनाने राज्यातील शेतकरी कामगार वर्ग पोरका झाला आहे. सबंध आयुष्यभर प्राध्यापक एन डी पाटील यांनी शेतकरी, कामगार, वंचितांच्या न्याय हक्कासाठी बिन तडजोड संघर्ष केला. लाखोंना न्याय मिळवून दिला. मार्क्सवादावर त्यांची अविचल निष्ठा होती. त्यांचे आचरण आदर्शवत होते. लोकप्रतिनिधी व महाराष्ट्राचे सहकार मंत्री म्हणून त्यांनी केलेले कार्य महाराष्ट्राची जनता कधीही विसरणार नाही. ते खऱ्या अर्थाने प्राध्यापक होते. त्यांची भाषणे म्हणजे अभ्यास वर्ग असत. त्यांना कार्यकर्त्यांबद्दल अत्यंत आपुलकी होती. प्रेमाने कार्यकर्त्यांची चौकशी ते करीत व  आत्मविश्वास देत असत. त्यांच्या जाण्याने पुरोगामी चळवळीतील प्रत्येकालाच आधार निघून गेल्याची भावना निर्माण होत आहे.

ग्राहकांसाठी खुशखबर ! आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने ‘नो टेन्शन’ 

परिवर्तनाच्या चळवळीतील विद्रोहाची ऊर्जा देणारा ऊर्जास्रोत हे – डॉ. उदय नारकर ( कोल्हापूर )

परिवर्तनाच्या चळवळीतील साऱ्या लहानथोर कार्यकर्त्यांना विद्रोहाची ऊर्जा देणारा, अन्यायाविरुद्ध लढण्याचा स्फुल्लिंग त्यांच्या अंतरात चेतवणारा ऊर्जास्रोत आज हरपला आहे. महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचा अध्वर्यू निमाला आहे. कष्टकरी आणि पददलितांच्या लढ्यांचे नेतृत्व करण्यात या क्रांतिदर्शी नेत्याने आपली उभी हयात खर्ची केली. तोच वारसा आपण पुढे नेण्यासाठी जीवन समर्पित करणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

एन. डी. पाटील : जनसंघर्षाचा नेता गेला – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते राजू देसले

महाराष्ट्रातील शेतकरी, कामगार व जनसामान्य यांच्या हिताचे रक्षण करणारे धीरोदात्त व्यक्तिमत्व. स्वातंत्र्य आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, भूमी मुक्ती आंदोलन, एनरॉन विरोधी आंदोलन, सेझ विरोधी आंदोलन अशी सुमारे 70 वर्षाची संघर्षाची वाटचाल करणारे नेतृत्व आज शांत झाले.

विशेष लेखमोदी आणि राहुलच्या पलीकडे पण जग आहे मित्रांनो… – चंद्रकांत झटाले

राज्यात कष्ट करणाऱ्या जनतेच्या प्रत्येक लढ्यात एन.डी अग्रेसर होते. त्यांच्या संघर्षातूनच रोजगार हमी योजना, कापूस एकाधिकार योजना, समान पाणी वाटपाचा आग्रह या समाज हिताच्या योजना उभ्या राहिल्या. अत्यंत अभ्यासू व  आग्रही असणाच्या एन. डी. पाटील यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष , आयटक, किसान सभा आदरांजली.  


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय