Friday, March 29, 2024
Homeजिल्हाकांदा व्यवसायिकाला फसवणं नडलं, शंभरच्या 22 खोट्या नोट्या देणाऱ्या टोळीचा नोटांचा छापखाना,...

कांदा व्यवसायिकाला फसवणं नडलं, शंभरच्या 22 खोट्या नोट्या देणाऱ्या टोळीचा नोटांचा छापखाना, तिघांना बेड्या !


रायगड / प्रमोद पानसरे
 : बनावट नोटा छापून त्‍या चलनात आणणाऱ्या टोळीचा रायगड पोलिसांच्‍या स्‍थानिक गुन्‍हे शाखेने पर्दाफाश केला आहे.

या प्रकरणी जयदीप घासे, सुमीत बागकर आणि कौस्‍तुभ गिजम या तिघांना अलिबागमधून अटक करण्‍यात आली आहे. त्‍यांच्‍याकडून नोटा छापण्‍यासाठी लागणारे प्रिंटर्स, लॅपटॉप, शाई, कागद तसेच शंभर, दोनशे आणि पाचशे अशा दराच्‍या एकाच बाजूने छापलेल्‍या 49 हजार 900 रुपयांच्‍या खोट्या नोटा हस्‍तगत करण्‍यात आल्‍या आहेत. काही आरोपींनी एका कांदा व्यापाऱ्याला बनावट नोटा देऊन त्याची फसवणूक केली. त्यानंतर हे सर्व प्रकरण उघड झालं.

अलिबागमध्ये दोन दिवसांपूर्वी कांदा व्यापाऱ्याला एका ग्राहकाने फसवलं होतं. संबंधित ग्राहकाने कांदे व्यापाऱ्याला 100 रुपयांच्या तब्बल 22 बनावट नोटा दिल्या होत्या. ग्राहक निघून गेल्यानंतर व्यापाऱ्याला आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाली होती. त्यानंतर कांदा व्यापाऱ्याने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पोलिसांनी संबंधित प्रकरणाची शाहनिशा केली.

कांदा व्यापाऱ्याने नेमकं कुणाकडून त्या नोटा घेतल्या याची माहिती मिळवली. या प्रकरणाचा तपास करत असताना यामागे मोठी टोळी असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपास करत त्यांच्या छापखान्यावर छापा टाकला. या छापेमारीत पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या. तसेच मोठा मुद्देमाल, छपाई मशीनसह शाई वगैरे जप्त केले. पोलिसांनी आरोपींना कोर्टात हजर केलं असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय