मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या कोरटकरला तेलंगणा येथून ताब्यात घेण्यात आले असून, ही कारवाई कोल्हापूर पोलिसांनी केली आहे.
Prashant Koratkar काय आहे प्रकरण?
प्रशांत कोरटकर याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधाने केल्याचा आरोप आहे. त्याने इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी दिली होती, ज्यामुळे त्याच्याविरोधात कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणानंतर कोरटकर 25 फेब्रुवारीपासून फरार होता. त्याने नागपूरहून चंद्रपूर आणि नंतर तेलंगणापर्यंत पलायन केल्याची माहिती समोर आली होती. कोल्हापूर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असताना, तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला होता. (हेही वाचा – सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच, अहवालात खळबळजनक खुलासे)
अटकेची कारवाई कशी झाली?
कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरला पकडण्यासाठी विशेष पथक स्थापन केले होते. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या हालचालींवर पोलिसांची करडी नजर होती. सूत्रांनुसार, कोरटकर तेलंगणात लपून बसला होता. पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने त्याचा ठावठिकाणा शोधून काढला आणि आज पहाटे त्याला ताब्यात घेतले. अटकेनंतर त्याला कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असून, लवकरच त्याला कोर्टात हजर केले जाईल. (हेही वाचा – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री होती राहुल गांधींवर फिदा, बघायची लपुनछपुन फोटो)
कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरने अटकपूर्व जामिनासाठी कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता, परंतु तो फेटाळण्यात आला. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयातही धाव घेतली, पण तिथेही त्याला दिलासा मिळाला नाही. न्यायालयाने त्याचा अंतरिम जामीन अर्ज रद्द केल्याने पोलिसांना त्याला अटक करण्याचा मार्ग मोकळा झाला. कोल्हापूर पोलिसांनी उच्च न्यायालयातही कोरटकरचा जामीन रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला होता, ज्यामुळे त्याच्यावरील कारवाईला गती मिळाली. (हेही वाचा – कुणाल कामराच्या एकनाथ शिंदे यांच्यावरील गाण्याने राडा, शिवसैनिकांकडून स्टुडिओची तोडफोड)
राजकीय संरक्षणाचा आरोप
या प्रकरणात प्रशांत कोरटकरला राजकीय संरक्षण मिळत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दावा केला होता की, कोरटकरला पोलिसांच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी सत्ताधारी पक्षातील काही नेते प्रयत्न करत होते. (हेही वाचा – न्यायाधीशाच्या घरी सापडले तब्बल 15 कोटीची रोख रक्कम, घरात आग अन्…)
प्रशांत कोरटकर कोण आहे?
प्रशांत कोरटकर हा नागपूरचा रहिवासी असून, तो स्वतःला पत्रकार आणि समाजमाध्यम प्रभावक म्हणवतो. त्याने टीव्ही पत्रकारितेपासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती आणि ‘विदर्भ माझा’ या यूट्यूब चॅनलचा संपादक म्हणूनही काम केले आहे. समाजमाध्यमांवर सक्रिय असलेला कोरटकर उच्चपदस्थ नेते आणि अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचेही बोलले जाते. त्याच्याकडे मर्सिडीजसारख्या महागड्या गाड्या आणि संपत्ती असल्याचा दावा काही राजकीय नेत्यांनी केला आहे.
अटकेनंतर कोरटकरला कोल्हापूरला आणले जाणार आहे, जिथे त्याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई होईल. पोलिस त्याची कसून चौकशी करणार असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास घेतला जाईल.