Thursday, September 19, 2024
Homeजिल्हापिंपरी : महिलांना समानतेची वागणूक मिळावी असे बसवण्णांचे कार्य आताच्या काळात ही...

पिंपरी : महिलांना समानतेची वागणूक मिळावी असे बसवण्णांचे कार्य आताच्या काळात ही दिशादर्शक – ॲड. मनीषा महाजन

पिंपरी चिंचवड : कल्याणकारी समाज निर्माण व्हावा म्हणून जातीभेद विरहित, श्रम करणाऱ्यास प्रतिष्ठा व सन्मान तसेच अतिरिक्त उत्पन्न समाजहितासाठी वापरला जावा आणि महिलांना समानतेची वागणूक मिळावी असे बसवण्णांचे कार्य आताच्या काळात ही दिशादर्शक आहे, असे ॲड. मनीषा महाजन म्हणाल्या. 

“बसवण्णांना कल्याणकारी समाजव्यवस्था निर्माण करायची होती. भारतातील वर्णव्यवस्थेतील सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी बाराव्या शतकात त्यांनी जाती भेद, सामाजिक विषमता नाकारली. मनुस्मृती प्रमाणे वर्णव्यवस्थेतील स्त्री पुरुष असमानता, कर्मकांडे, अस्पृश्यता, अंधश्रद्धा याविरोधी जनजागृती केली. सर्व मानव समान आहेत  हा विचार मांडून बसवण्णांनी मनुस्मृती प्रमाणे वर्णव्यवस्था नाकारली.

वचन अध्ययन बसवमंच आयोजित ऑनलाइन व्याख्यान माले मध्ये “बसव तत्वे व भारतीय संविधान” या विषयावर ऍड.मनीषा महाजन आकुर्डी बोलत होत्या.

प्राचीन मनुस्मृती काळातील विषम समाज व्यवस्थेविरोधात कर्नाटकात महात्मा बसवेश्वरांनी केलेल्या कार्याचा उल्लेख करून त्या पुढे म्हणाल्या की, शास्त्र, स्मृती, आगम यांच्या वर्चस्वाला नाकारून स्वतंत्र लिंगायत धर्माची स्थापना केली. महिलांना दुय्यम वागणूक देणाऱ्या व्यवस्थेचा विरोध करून महिलांना मुख्य प्रवाहामध्ये अनुभव मंटपाच्या  माध्यमातून सहभागी करून घेऊन विचार स्वातंत्र्य प्रदान केले. ज्या समाजाला आणि महिलांना मंदिर प्रवेश निषिद्ध होता अश्या सर्वांना लिंगदिक्षा देऊन सर्वांसाठी भक्तिमार्ग खुला केला.

भारतीय संविधानात अंतर्भूत  अस्पृश्यता नष्ट करण्याबाबत, समानता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, मानवतावाद, सुधारणावाद, वैज्ञानिक दृष्टिकोन, अश्या मानवी हकाबाबत जो उल्लेख आहे त्याविषयी बाराव्या शतकात बसवण्णांनी समाजाचा विरोध पत्करून काम केले.

आजही आंतरजातीय विवाह समाजाने पूर्णतः स्वीकारलेले नाहीत. परंतु बाराव्या शतकात बसव अण्णांनी आंतरजातीय लग्न व्हावेत यासाठी बसवण्णांनी पूर्वाश्रमीचे ब्राम्हण  मधुवरस यांची मुलगी लावण्यवती व चांभार हरळय्या यांचा मुलगा शिलवंत यांचा आंतरजातीय विवाह लावला. 

संविधानातील प्रस्तविकेमध्ये अभिप्रेत समाजाची अपेक्षा बाराव्या शतकात बसवण्णांनी केली होती, ही बाब सर्व सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा विचार वचन अध्ययन वेदिके मार्फत केले जात आहे हे कौतुकास्पद आहे. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयश्री पट्टन यांनी केले, सूत्रसंचालन शरण रविंद्र खुबा सूत्र संचालन शरण रुद्रमुर्ती, शरणकुमार राजान्ना, शरणी सुजाता पाटील यांनी तर आभारप्रदर्शन प्रतिभा अळेगावी यांनी केले.

– क्रांतिकुमार कडुलकर


संबंधित लेख

लोकप्रिय