Thursday, January 23, 2025

पिंपरी : पथारी, हातगाडी व स्टॉलधारकांवरील महापालिकेच्या कारवाईस उच्च न्यायालयाची स्थगिती

महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या प्रयत्नाला यश

स्टॉलधारक व विक्रेत्यामधे आनंदाचे वातावरण

पिंपरी, दि.१६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील विविध भागात गेल्या काही दिवसांपासुन स्मार्टसिटीच्या नावाखाली टपरी, हातगाडी, पथारी यांच्यावरील होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष व कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती व न्यायालयानेही कष्टकरी विक्रेत्यांच्या न्यायाची भुमिका घेत या महापालिका कारवाईस स्थगिती दिली आहे, त्यामुळे या स्टॉलधारक व विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात पथारी, हातगाडी, टपरी व स्टॉलधारक व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत असुन केंद्र सरकारने यासाठी “फेरीवाला कायदा २०१४” केला परंतु याची अमंलबजावणी न करता पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी स्वच्छ शहर व स्मार्ट सिटीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात कारवाईचे आदेश दिले, फेरीवाल्यांना त्यांच्यामुळ व्यासायिक जागेवरुन हटवुन त्यांना इतरत्र जाण्यास भाग पाडुन त्यांच्या उपजीविकेवर गदा आणण्याचे काम सुरू झाले होते. या बेकायदेशीर कामाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने कारवाईस स्थगिती दिली आहे, याचे महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, महाराष्ट्र हॉकर फेडरेशनतर्फे आज स्वागत करण्यात आले.

यावेळी नखाते म्हणाले की, “आपला देश हा कायद्यावर चालतो, जसं श्रीमंताला जगण्याचा अधिकार आहे, तसाच गोरगरिबांना ही जगण्याचा  अधिकार आहे. महापालिकेच्या अनेक चुकांमुळे हॉकर झोनला तिलांजली मिळाली आणि प्रत्यक्ष  हॉकर झोन अस्तित्वात आले नाही याचा दोष फेरीवाल्यांवर देणे चुकीचे आहे. 

पिंपरी चिंचवड शहरात सांगवी, डांगे चौक, दापोडी, काळेवाडी, भोसरी, रावेत, वाल्हेकरवाडी, निगडी, चिंचवड, पिंपरी, चिखली, मोशी विविध भागात दररोज अन्यायकारक कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त केले जात होते म्हणून या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये आम्ही महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीने याचिका दाखल केली होती. शहरामध्ये विविध ठिकाणी स्मार्टसिटी आणि अर्बन स्ट्रीटच्या नावाखाली शहर सुशोभीकरणात गोरगरिबाला चिरडण्याचे प्रकार अनेक दिवसापासून सुरू आहेत. सुरुवातीच्या कालावधीमध्ये जप्त हातगाडी, टपरी सोडवण्यासाठी सहा हजार चारशे ते अडोतीस  हजार एवढा मोठा दंड मुद्दाम लावण्यात आला, हा दंड अन्यायकारक असून केवळ फेरीवाल्यांना संपवण्याचे कट-कारस्थान होत आहे असे नखाते म्हणाले.

नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र हॉकर फेडरेशन आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ ही लढाई लढत आहे यापुढे ही फेरीवाला घटकाच्या न्यायासाठी  लढाई अशीच सुरु राहील. कायदेशीर बाबी म्हणून क्रांती एल.सी आणि कौस्तुभ गीड यांनी  पथ विक्रेत्यांची बाजू मांडली. पिंपरी चिंचवड शहरातील पथारी, हातगाडी, स्टॉलधारकांना मा.उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे दिलासा मिळाला असुन आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.”

यावेळी काशिनाथ नखाते यांच्यासह कार्याध्यक्ष इरफान चौधरी, राजू बिराजदार, संघटक अनिल बारवकर, यासीन शेख, सय्यद आली, संभाजी वाघमारे, फरीद शेख, सागर बोराडे, नितीन भराटे, सुधीर गुप्ता, रवींद्र जाधव, समीर दिघे, सुशेन खरात, अमृत माने, उमेश डोरले, राजेश माने, दौलत कोंगे, राजाभाऊ हाके, अंबालाल सुकवाल, पप्पू तेली, विशाल मेहेर, देवीलाल आहेर, हरी भोई, विनोद गवई आदी उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles