Thursday, September 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडपिंपरी चिंचवड : मनुस्मृती दहनाचा प्रतिकात्मक कार्यक्रम संपन्न

पिंपरी चिंचवड : मनुस्मृती दहनाचा प्रतिकात्मक कार्यक्रम संपन्न

स्त्रियांना धार्मिक गुलामगिरी मधून मुक्त करण्याचा संदेश दिला – मानव कांबळे 

पिंपरी चिंचवड : आजही 25 डिसेंबर 2021 रोजी सकाळी दहा वाजता मनुस्मृती दहनाचा प्रतिकात्मक कार्यक्रम उपस्थित युवतींच्या हस्ते करण्यात आला.

मानव कांबळे म्हणाले, महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामधील भीमसृष्टी समूह शिल्पांमध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृतीचे दहन करून, देशातील बहुजन, दलित, आदिवासी व विशेषतः स्त्रियांना धार्मिक गुलामगिरी मधून मुक्त करण्याचा संदेश दिला होता. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातली हा अतिशय महत्त्वाचा प्रसंग असून, या त्यांच्या एका कृतीमुळे संपूर्ण वर्णव्यवस्थेला जबरदस्त धक्का देण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले होते. या प्रसंगाचे समूहशिल्प भीम सृष्टीतील समूह शिल्पांमध्ये असलेच पाहिजे. असा आमच्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व पुरोगामी पक्ष संघटना व कार्यकर्त्यांचा आग्रह होता, असे नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे म्हणाले.

भारतीय जनता पक्ष शासित पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने जाणीवपूर्वक हे शिल्प भीमसृष्टी मधून वगळण्याचे षडयंत्र केले होते. भिम सृष्टी उद्घाटनाच्या समारंभामध्ये केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदासजी आठवले यांनीही या शिल्पाचा समावेश भिम सुष्टी मध्ये करण्यात यावा असे प्रशासनाला सुचविले होते. तत्कालीन मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यास मान्यताही दिली होती, परंतु अजूनही तीन वर्षाचा काळ उलटून गेला तरी मनुस्मृती दहनाचा प्रसंग दर्शवणारे समूहशिल्प उभारण्यात आले नाही. प्रशासनाच्या या कृतीचा निषेध म्हणून मागील तीन वर्षांपासून शहरातील सर्व पुरोगामी संघटनांच्या वतीने दर 25 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मनुस्मृतीचे प्रतिकात्मक दहन करण्याचा कार्यक्रम करण्यात येतो, असेही कांबळे म्हणाले.

नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात माजी नगरसेवक मारुती भापकर, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, वंचित बहुजन आघाडीचे संतोष जोगदंड, संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, ओबीसी संघर्ष समितीचे सुरेश गायकवाड, गौतम गजभार, मनोज गजभार, अपना वतन संघटनेचे सिद्दिक शेख, बारा बलुतेदार महासंघाचे प्रताप गुरव, नागरी हक्क सुरक्षा समितीचे दिलीप काकडे, अशोक मोहिते, गिरीश वाघमारे, प्रहार जनशक्ती पक्षाचे नीरज कडू यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

– क्रांतिकुमार कडुलकर


संबंधित लेख

लोकप्रिय