पिंपरी चिंचवड : घरेलु कामगारांचे लसीकरण प्राधान्याने करण्याची मागणी क्रांतिकारी घरकामगार संघटनेचे डॉ. सुरेश बेरी यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, घरेलु कामगारांना कामानिमित्त अनेक घरांमध्ये जावे लागते. त्यांचे लसीकरण झालेले नसल्यामुळे त्यांना अनेक ठिकाणी प्रवेश नाकारला जातोय. त्यामुळे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. सरकारने त्यांच्यासाठी १५००रूपये चे तुटपुंजे सहाय्य जाहीर केले आहे. पण ते फक्त नोंदणीकृत घरकामगार यांच्यासाठी आहे. नोंदणी न झालेले घरकामगार मोठ्या संख्येने आहेत. त्यांच्या नोंदणीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही बेरी म्हणाले आहेत.
या कामगारांचे लसीकरण झाल्यास त्यांची सुटणारी कामे वाचतील आणि त्यामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आधार मिळेल. या घरकामगार यांचे लसीकरण स्वतंत्रपणे प्रत्येक झोनमध्ये एक केंद्र उघडून प्राधान्याने व लवकरात लवकर करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. तसेच याबाबत निर्णय घेतल्यास आमच्या संघटनेच्या सभासदांची यादी आम्ही आपणास सादर करू, असेही म्हटले आहे.