पिंपरी चिंचवड : संपूर्ण जगात 6000 पेक्षा जास्त भाषा आहेत. इंग्रजी आपल्या विद्यार्थाना सहज शिकता येते. इंग्रजीमूळे अमेरिका आणि ब्रिटन राष्ट्रकुलातील अनेक राष्ट्रात आपल्या विदयार्थ्यांना चांगल्या संधी मिळाल्या. युरोपियन महासंघातील जर्मनी ही मोठी आर्थिक, औद्योगिक महासत्ता आहे. जर्मनी आणि भारत या दोन देशात गेल्या वीस वर्षांत व्यापार आणि औद्योगिक संबंध वृद्धिंगत झाले असून रोजगार आणि शिक्षणाच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. देशातील शेकडो विद्यार्थी दरवर्षी प्राविण्य मिळवून जर्मनी मध्ये जात आहेत आणि जर्मनीतील विदयार्थी भारतात शिक्षण घेत आहेत. सेवा, निर्मिती, वाहन उद्योगात जर्मन आणि भारतीय कंपन्यांचे सहकार्य करार झालेले आहेत. त्यामुळे जर्मन भाषा शिकण्यासाठी विविध संधी पिंपरी चिंचवड शहरात उपलब्ध आहेत, आम्ही मराठी भाषिक आहोत, त्यामुळे आम्हाला परदेशी भाषा शिकता येणार नाही, हा एक मोठा गैरसमज आहे. असे मत जर्मन भाषा तज्ञ आणि LangProfis India Pvt. Ltd. ची अध्यक्षा व संचालिका मेघना बेरी-भंडारी यांनी आकुर्डी येथे व्यक्त केले.
डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया(डी वाय एफ आय) आणि अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, पिंपरी चिंचवड शहर शाखेने आकुर्डी येथे “सहज बोलावे, सहज शिकावे” या कार्यक्रमात युवक, विद्यार्थी मेळाव्यात 15 ऑगस्ट रोजी त्या बोलत होत्या.
पुढे बोलताना म्हणाल्या की, मराठी माध्यमातून शालेय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी देखील जर्मन भाषेमध्ये प्राविण्य मिळवले आहे. मातृभाषेतून जर्मन भाषा शिकता येते. पुणे येथील मॅक्स म्युलर भवन, रानडे इन्स्टिट्युट आणि विविध संस्था जर्मन भाषा शिकवत आहेत. आम्ही सुद्धा शहरातील होतकरू विद्यार्थाना परदेशी भाषा शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. परदेशी भाषा शिकल्याचा विद्यार्थ्यांना आणि व्यावसायिकांना IFS, MBA, Engineering, Medicine इत्यादी क्षेत्रांत भरपूर फायदा होतो.
जर्मन भाषा अनुवादक आणि दुभाषी भाविन भंडारी म्हणाले, विविध देशातील अनेक कंपन्या भारतात आहेत. चीन, जपान नंतर भारत ही एक नवी आर्थिक सत्ता आहे. जर्मनी मध्ये भारतीय भाषा तेथील विद्यार्थी शिकत आहेत. वाहन (automobile), आधुनिक मशिनरी, सेवा, माहिती तंत्रज्ञान (IT, INFORMATION, SERVICE) या क्षेत्रातीळ शेकडो जर्मन कंपन्या भारतात कार्यरत आहेत. आपल्या शहरातील विद्यार्थी आणि पालकांनी परदेशी भाषा शिक्षणासाठी प्रवृत्त व्हावे. त्यांनी बहुभाषिक व्हावे. मात्र, कोणतीही परकीय भाषा शिकल्यानंतर तिचा सराव सातत्याने करत रहावे, नाहीतर त्या भाषेचा विसर पडतो. जर्मन भाषा शिकण्यासाठी विविध प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत, जसे की BA, MA, Translation course, Teacher’s training course, Professional course इत्यादी कोर्सेस आहेत.
विशेषतः युरोपातील 28 देश एकत्र येऊन युरोपियन युनियन तयार झाली आहे.
जर्मनी मध्ये भारतीय विद्यार्थाना उच्च शिक्षण आणि नोकरीच्या संधी प्राप्त होत आहेत.
त्यामुळे युवक, विद्यार्थी, महिला कार्यकर्त्यांनी परदेशी भाषा शिक्षणासाठी उपलब्ध संधीचा फायदा घ्यावा. पिंपरी चिंचवड शहरात होतकरू विद्यार्थानी आपली परदेशी जाण्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मनातील गैरसमज दूर करावेत आणि मराठी भाषिक विद्यार्थीही सहज जर्मन भाषा शिकू शकतात, असेही भंडारी म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन युवक प्रशिक्षण विभागाचे अमिन शेख, स्वप्निल जेवळे, सोनाली मन्हास यानी केले.
विशाल पेटारे, शिवराज अवलोळ, योगिता कांबळे, मनीषा सपकाळे, जय डोळस, आफताब शेख, शेहनाज शेख, सोनाली शिंदे
यांनी संयोजन केले.