Wednesday, February 5, 2025

पिंपरी चिंचवड : महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा बंद यशस्वी झाल्याचा दावा

पिंपरी चिंचवड : महाविकास आघाडीतील पक्षांनी (काँगेस, राष्ट्रवादी, शिवसेना) पुकारलेल्या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. रविवारी आठवडा सुटी असल्यामुळे आजच्या बंदमध्ये कामगार वर्ग सामील झाला नाही. 

तिन्ही पक्षांनी बंद शांततेत करावा, कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, यासाठी कार्यकर्त्यांना आदेश दिले होते. निगडी, आकुर्डी, दत्तवाडी, विठ्ठलवाडी, पिंपरी, चिखली, भोसरी, तळवडे, चिंचवडगाव, पिंपळे सौदागर, कासारवाडी, दापोडी, काळेवाडी इतर प्रमुख उपनगरात दुकाने सुरू होती. व्यापारी वर्गाने बंदला विरोध केलेला नाही, मात्र नवरात्रीचा उत्सव असल्याने अर्थकारण बिघडू नये, यासाठी दुकाने सुरू ठेवली होती. मिरवणुकीने कार्यकर्ते सभा स्थळी येत होते.

कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला संघर्ष महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने कॉ. काशीनाथ नखाते यांच्या नेतृत्वाखाली थर्माक्स चौक (चिंचवड) ते पिंपरी अशी तीन किलोमीटरची मोटार सायकल रॅली शहरातून काढण्यात आली. शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून ठार मारणाऱ्या केंद्रीय मंत्री अजय मिश्रा आणि मोदी सरकार विरोधात सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता. महाविकास आघाडीच्या या बंदला शहरातील समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष, रिपब्लिकन पक्ष (जोगेंद्र कवाडे गट) सह इंटक, सिटू, आयटक यांनी पाठिंबा दिला.

सोमवारचा महाराष्ट्र बंद यशस्वी व्हावा यासाठी महाविकास आघाडीतील सर्व पक्ष आणि इतर समविचारी पक्षांनी एकत्र येऊन व्यापाऱ्यांशी, कामगार, लघुउद्योजकांशी बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये सर्व नागरिकांनी केंद्र सरकार विरुध्द तीव्र भावना व्यक्त केल्या. समाजातील सर्व घटक महिला, कामगार, शेतकरी, व्यापारी, उद्योजक, सर्वच क्षेत्रातील सर्वसामान्य नागरिक आज केंद्र सरकारच्या निष्ठूरपणा विरुध्द संतप्त झालेले आहेत. देशाचा पोशींदा बळीराजा आणि कामगार यांनाच संपवण्याचे काम मोदींचे सरकार करीत आहे. आज देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना मोदी – शहा यांच्या सरकारने सत्तर – पंचाहत्तर वर्षात उभा केलेला भारत विकायला काढला आहे. लाखो कामगारांनी लढून संमत झालेले कामगार कायदे आताच्या केंद्र सरकारने मोडीत काढले आहेत. कोणताही शेतकरी, कामगार किंवा कामगार संघटनांची मागणी नसतानाही भांडवलदारांना फायदा मिळवून देणारे आणि पुढच्या पिढ्या गुलामगिरीत ढकलणारे कायदे मोदी सरकारने केले.

कैलास कदम (शहराध्यक्ष, इंदिरा काँग्रेस)

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून त्यांनी घेतलेले सर्व निर्णय जनता विरोधी ठरलेले आहेत. पूर्वीचे सर्व कामगार आणि कृषी कायदे बरखास्त करून देशांमधील श्रमिक आणि शेतकरी वर्गाचे सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य त्यांनी हिरावून घेतले आहे. त्यामुळे देशात असंतोष आहे. सरकारच्या विरोधात सुरू असलेले शेतकरी आंदोलन त्यांनी चिरडण्याचा प्रयत्न केला. पण तो यशस्वी झाला नाही. उलट आंदोलक शेतकऱ्यावर मोटारी घालून त्यांना चिरडण्यात आले, याचा आम्ही निषेध करतो.

संजोग वाघेरे-पाटील (शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)

मोदी फक्त भांडवलदारांचे काम करतात. अत्यंत बेमालूमपणे खोटे बोलणारे कोणते पंतप्रधान असतील तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. पिंपरी चिंचवड शहर जसे कामगार नगरी आहे तसे ते शेतकऱ्यांचेही शहर आहे. या राज्याला उध्दव ठाकरे यांच्या रुपाने मितभाषी, समयसूचक मुख्यमंत्री मिळाले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि लोकनेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पुन्हा विकासात एक नंबरवर येईल.

विलास लांडे (माजी आमदार)

कामगार आणि शेतकरी यांच्या चळवळी दडपून असंतोष थांबणार नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू, महात्मा फुले यांच्या विचाराने शांततामय आंदोलने देशभर सुरू आहेत. एकतर्फी कृषी आणि कामगार कायदे संमत करून मोदी सरकार कार्पोरेट लॉबीला मुक्त पिळवणुकीचे अधिकार देत आहे. २०१४ पूर्वी परदेशी गुंतवणूकीला कठोर विरोध करणाऱ्या भाजपने सर्व क्षेत्रात १००% खाजगी गुंतवणुकीला परवानगी देऊन मोठा यु टर्न घेतला आहे.

काशिनाथ नखाते (प्रदेशाध्यक्ष, कष्टकरी संघर्ष महासंघ)

भाजपाच्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने अंगावर गाडी घातल्यामुळे शहीद व जखमी झालेले शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळालाच पाहिजे. भाजपच्या दडपशाही विरोधात शेतकरी कामगार  यांची एकजूट देशात निर्माण झालेली आहे. सरकारच्या अन्यायी आर्थिक धोरणाविरोधात शेतकरी सलग दहा महिने लढत आहेत, त्यांच्या मागण्या केंद्र सरकारने मान्य कराव्यात. सरकारने पास केलेले शेतकरी विरोधी राक्षसी कायदे मागे घ्यावेत यासाठी महाविकास आघाडीच्या “महाराष्ट्र बंद” च्या हाकेला आम आदमी पार्टी ने सक्रिय पाठिंबा दिला आहे.

चेतन बेंद्रे (आम आदमी पक्ष)


व्यापारी व्यावसायिक व इतर सर्वच घटकांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली. पिंपरी-चिंचवड शहरात देखील या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे आंदोलन म्हणजे ‘महा’फुसका बार ठरले आहे.

– अमोल थोरात (भाजपाचे पिंपरी- चिंचवड शहर प्रवक्ते)

यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, शिवसेना सहसंपर्क प्रमुख योगेश बाबर, शिवसेना शहराध्यक्ष ॲड. सचिन भोसले, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, विलास लांडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, ज्येष्ठ नेते मानव कांबळे, शिवसेना जिल्हा संघटीका सुलभा उबाळे, शहर संघटीका अॅड. उर्मिला काळभोर, नगरसेवक डब्बू आसवाणी, अजित गव्हाणे, डॉ. वैशाली घोडेकर, सुलक्षणा धर, निकीता कदम, संगिता ताम्हाणे आणि माजी नगरसेवक सुमनताई पवळे, शमीम पठाण, प्रशांत शितोळे, अरुण बो-हाडे, मारुती भापकर, जगदीश शेट्टी, सनी ओव्हाळ, प्रसाद शेट्टी, तानाजी खाडे, विजय कापसे, रमा ओव्हाळ तसेच विजय लोखंडे, फझल शेख, नरेंद्र बनसोडे, अनिल रोहम, अशोक मोरे, राजेंद्रसिंह वालिया, डॉ. वसीम इनामदार, नीरज कडू, वैशाली मराठे, अनुजा कुमार, उमेश खंदारे, तारीक रिझवी, सौरभ शिंदे, शाकीब खान, संदीप जाधव, चेतन बेंद्रे, वैजनाथ शिरसाठ, स्वप्निल जेवळे, नंदू नारंग, मिलिंद ढवळसकर, सरोज कदम, सर्फराज मुल्ला, आशुतोष शेळके आदी उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles