आकुर्डी : पंचतारानगर, पांढरकरनगर, गुरुदेव नगर या आकुर्डी गावातील दाट वस्तीच्या परिसरात धोकादायक आणि उघडे डीपी बॉक्स, खोदाई करून ठेवलेले रस्ते, दरवाजा तुटलेली शौचालये, ओढ्यातील प्रदूषणामुळे परिसरात पसरणारी दुर्गंधी यामुळे येथील नागरिक त्रस्त झालेले आहेत.
वारंवार मागणी करूनही आकुर्डीतील नागरी समस्या आणि नागरी सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या मनपा प्रशासन आणि महावितरणच्या विरोधात आंदोलन करूण्याचा इशारा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जयवंत काळभोर, बाळासाहेब कुदळे, प्रसाद साकुरे यांनी दिला आहे.
मनपाच्या ‘अ’ प्रभाग अधिकाऱ्यांचे येथील आरोग्य व्यवस्था आणि रस्ते दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. गेली 5 वर्षे आकुर्डी गाव परिसराच्या नागरी समस्यांंकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
महावितरणचे वस्तीतील अनेक डीपी बॉक्स उघडे आहेत. रस्त्यावर मुले खेळत असतात. पावसाळ्यात या डीपी बॉक्स मध्ये मोठ्या प्रमाणात ठिणग्या होऊन वीजपुरवठा खंडित झाला होता.
शौचालयाचे दरवाजे तुटलेले आहेत. दिवसातून तीन वेळा शौचालयाचे सानिटायझेशन करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात शौचालये बांधलेली नाहीत, असे अनेक नागरिक प्रश्न निर्माण झालेले आहेत.