Wednesday, September 18, 2024
Homeजिल्हापिंपरी चिंचवड : 24 तास पाण्यासाठी आम आदमी पार्टी रस्त्यावर

पिंपरी चिंचवड : 24 तास पाण्यासाठी आम आदमी पार्टी रस्त्यावर

नियमित पाणी पुरवठ्यासाठी आपच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात निदर्शने आंदोलन

पिंपरी चिंचवड : आम आदमी पक्षाने मूलभूत प्रश्नांवर काम करत पाण्याचा ज्वलंत प्रश्न हाती घेत पिंपळे सौदागर येथील शिवार चौकात ३० एप्रिल रोजी महापालिके विरोधात आंदोलन करण्यात आले.

पाणी म्हणजे जीवन आणि ऐन उन्हाळ्यात पिंपरी चिंचवडमध्ये पाणी प्रश्न आ वासून उभा आहे, अनेक भागात पाणी पुरवठा विस्कळीत झालाय, बऱ्याच भागात तो अनियमित असून, पाणी कपात देखील सहन करावी लागत आहे, हे कमी होते म्हणून काय तर अनेक भागात दूषित पाणी पुरवठा देखील होत असून नागरिकांचं रोजचं जगणच कष्टप्रद झालेलं आहे अशी टिका आपने केली आहे.

आप शहर प्रवक्ता प्रकाश हगवणे यांनी महापालिकेच्या ढासळलेल्या कारभारावर बोट ठेवत नागरिकांच्या आयुष्याशी निगडीत महत्त्वाच्या प्रश्नाला बगल देण्याच्या नगरसेवकांच्या वृत्तीबद्दल खेद व्यक्त केला. पाण्याची योग्य प्रमाणात उपलब्धता असताना देखील नियोजनाच्या अभावामुळे नागरिकांना या प्रश्नाला तोंड देत पाणी कपात आणि अनियमित पुरवठा सहन करावा लागत आहे याबद्दल देखील संताप व्यक्त केला.

प्रचारप्रमुख राज चाकणे यांनी पाणी तसेच आरोग्याच्या प्रश्नांवर आम आदमी पक्षाच्या दिल्ली सरकारने केलेल्या कामगिरीचा दाखला देत पुणे तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेने देखील नागरिकांसाठी अशा सोयी-सुविधा करण्याची गरज असल्याचे नमूद केले तसेच ते करण्यासाठी आवश्यक असलेली सकारात्मक वृत्ती महापालिकेमध्ये दिसत नाही व अनेक प्रसंगी महापालिकेला निवेदन देऊन देखील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर काम होत नाही याबद्दल याबद्दल खेद व्यक्त केला.

आम आदमी पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या सरोज कदम यांनी पाणी प्रश्नामुळे गृहिणींना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाबद्दल बोलत दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपा फक्त खोट्या घोषणा देत, फक्त धार्मिक विद्वेष पसरवण्याचे काम करत नागरिकांच्या मुलभूत पक्ष प्रश्नांना बगल देत आहे आणि त्याविरुद्ध लढण्या साठी सर्वांनी एकत्र येत आंदोलन करण्याची गरज असल्याचं नमूद केले.

आप पिंपरी-चिंचवडचे  कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी सविस्तरपणे बोलत महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला, पाच वर्षांपूर्वी टँकरमुक्त पिंपरी-चिंचवड करण्याच्या वल्गना करणाऱ्या भाजपाने नागरिकांना सध्या पाण्याच्या प्रश्नाची देखील सोय न लावता सोसायट्यांना टँकर साठी कित्येक कोटी भरण्यास मजबूर केले आहे. आर्थिकदृष्ट्या सर्वात मजबूत असलेल्या पिंपरी चिंचवडमहपालिकेने सर्वात अधिक घरपट्टी आणि पाणीपट्टी आकारून देखील नागरिकांना पाण्यासारख्या मूलभूत आणि महत्वाच्या सुविधांपासून वंचित ठेवत आपला अकार्यक्षम कारभार दाखवून दिलेला आहे. पालिकेच्या भ्रष्ट कारभाराचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत असल्या बद्दल संताप व्यक्त केला.

आंदोलन प्रसंगी शहर संपर्क प्रमुख वैजनाथ शिरसाठ, जेष्ठ कार्यकर्ते एकनाथ पाठक, पिंपरी संपर्क प्रमुख चंद्रमणी जावळे, युवा प्रमुख गौतम कुडुक, प्रशासकीय प्रमुख यल्लाप्पा वाळदोर, शांताराम बोऱ्हाडे आदी कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सचिन अहिरे, तेजस्विनी नशरुल्ला, मीना जावळे, धर्मेंद्र मोरया, राज चाकणे, गोविंद माळी, युवराज गायकवाडसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख

लोकप्रिय