पिंपरी चिंचवड : चिखली येथील घरकुल परीसरात गेले महिनाभर कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. येथे २२ हजार नागरिक रहात आहेत. प्रत्येक इमारतीत ४२ फ्लॅट असून अंदाजे १७० नागरिक एका सोसायटीमध्ये राहतात, अशा १४० सोसायटीत लोक रहायला आले आहेत. गेले महिनाभर कमी दाबाने येणाऱ्या पाण्यामुळे टाक्या पूर्ण भरत नाहीत. त्यामुळे घरकुल मधील रहिवाश्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
घरकुल मधील टेरेसवर असलेल्या मोठ्या टाकीत पाणी संचय झाल्यानंतर दिवसभर गृहिणींना दैनंदिन कपडे, धुणी भांडी यासाठी पाणी पुरत असे, या दाट लोकवस्तीला प्राधान्याने नियमित पाणीपुरवठा करण्याची मनपाची जबाबदारी आहे. सोसायटीतील पाणी सकाळी ९ वाजता जाते. यातच स्मार्ट सिटी अंतर्गत सर्व सोसायटीत पाणी मीटर नविन बदलून दिले आहेत. यात कमी दाबाने पाणी पुरवठा केल्याने फक्त हवा येते व मिटर रीडींग फिरते पण परंतु पाणी येत नाही असा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यां समोर पाणी कसे पुरवावे हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.
महीना झाला जाणिवपूर्वक कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातोय, उन्हाळ्यात पाण्याचा त्रास झाला नाही पण आता रोज तक्रारी येत आहेत. प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारींची दखल न घेतल्यास हंडा मोर्चा काढू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अशोक मगर यांनी दिला आहे.
पूर्वी दिवसा पाणी पुरवठा पूर्ण दाबाने व्हायचा. नवीन ऑटो रिडींग पाण्याचे मीटर मनपाने जनतेची मागणी नसताना नवीन मीटर कशासाठी बसवले? बसवल्यानंतर पाणी पुरवठा रात्रीचा सुरू केला आहे. मीटरमध्ये तांत्रिक दोष असण्याची शक्यता आहे. त्यामुळे टाकीत पाणी उशिरा जमा होते. मीटर मध्ये एअर लॉक होऊन टाकीत पडणाऱ्या पाण्याचे प्रेशर कमी होऊ शकते, प्रशासनाने डेमो न दाखवता नवे मीटर लावलेले आहेत. त्याबद्दल सोसायटी पदाधिकाऱ्यांना काहीही सांगितले गेले नाही.
– विकासराजे केदारी (नागरिक)
पूर्वी सकाळी मनपाचे पाणी यायचे, त्यामुळे दिवसभर पुरेसे पाणी सोसायटीमध्ये मिळायचे. आता रात्री कमी दाबाने पाणी येते, धुणीभांडी, स्वयंपाक आणि दिवसभर टेरेसच्या टाकीत पुरेसा साठा असला तर सर्वाना पाणी मिळते. प्रशासन अतिशय निष्काळजी आहे. त्यामुळे पाण्याची वाट बघत रहावी लागते. झोपायच्या वेळेला पाणी देऊन काय फायदा?
– निर्मला येवले (गृहिणी)
नागरिकांना पाणी तूटवड्याची सवय झाली आहे. आता पाणी कधी येईल सांगता येत नाही. पाणी वितरण व्यवस्था कोसळली आहे. माणशी ५०० लिटर पाणी लागते, चार तास पूर्ण दाबाने पाणी येत नाही. करोना काळापासून पाणी व्यवस्थापन बिघडले आहे. घरकुल मध्ये एकही लोकप्रतिनिधी रहात नसल्यामुळे त्यांना येथील समस्या आणि नागरिकांचे दुःख कळणार नाही. पाणी नसल्यामुळे महिलावर्ग त्रस्त आहे.
– उदयकुमार पाटील (नागरिक)
टँकरने पाणी विकत घेणे परवडत नाही. यामुळे सोसायटीत वाद निर्माण झाले आहेत. ऐन उन्हाळ्यात पाण्याची तक्रार नव्हती पण आता रोज तक्रारी येत आहेत. अधिकारी फक्त दिवस ढकलत आहेत येत्या चार दिवसात पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर गुरूवारी पालिकेत हंडा मोर्चा काढला जाईल असा ईशारा नागरिकांनी दिला आहे.